दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : सुकन्या समृध्दी योजनेची डाक पालाकडे (पोस्टाच्या प्रमुखाकडे) दिलेली दीड लाखाची रक्कम त्याने पास बुकावर नोंद करुन घेतली परंतु ती रक्कम पोस्टाच्या तिजोरीत जमा न करता त्या डाकपालाने आपल्या खिशात कोंबली. अत्यंत विश्वसनीय म्हणून बघितले जाणाऱ्या पोस्ट खात्यालाच त्या डाकपालाने विश्वासघाताचं ग्रहण लावण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न केला आहे, तो निंदनीय असाच म्हणावा लागेल. कुबुध्दीने पछाडलेल्या त्या डाकपालावर कायद्यानुसार जी काही दंडात्मक कारवाई होईल तेव्हा होईल परंतु विश्वासार्हतेला तडा लावणाऱ्या या डाकपालामुळे जनसामान्यांसमोर मात्र चिंतात्मक प्रश्न चिन्ह उभारल्यास निश्चितच नवल वाटू नये.
रामकिशन भानुदास हजारे असे त्या शाखा डाकपालाचे नाव आहे. परभणी तालुक्यातील भोगाव (साबळे) येथील ते पोस्ट कार्यालय आहे. डाकपाल रामकिशन हजारे यांनी संबंधित खातेदाराकडून रुपये एक लाख ४९ हजार एवढी रक्कम सुकन्या समृध्दी योजनेची म्हणून स्वीकारली होती. ती रक्कम त्यांनी खातेदाराच्या पासबुकातही नोंदविली होती. तथापि ती रक्कम पोस्टाच्या तिजोरीत जमा न करता हजारे यांनी स्वतःच्याच खिशात कोंबली असल्याचे निष्पन्न झाले.
२७ ऑक्टोबर २०१६ ते २० फेब्रुवारी २०१७ दरम्यान हा अपहार झाल्याचे समजते. मुदतीनंतर खातेदाराने रकमेची मागणी केली असता ती रक्कमच खात्यावर जमा नसल्याचे आढळून आले. भयभीत खातेदाराने याप्रकरणी वरिष्ठांकडे धाव घेऊन अधिक चौकशी केली असता यात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय निर्माण झाला. वरिष्ठांनी हजारे यांच्याकडे चौकशी केली असता ती रक्कम शासकीय तिजोरीत न भरता मी माझ्या स्वतःसाठी वापरल्याचे हजारे यांनी सांगितले. याचाच अर्थ हजारे यांनी संबंधित ग्राहकाचीच नव्हे तर पोष्टाची पर्यायाने शासनाचीच घोर फसवणूक केल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून डाकघराचे सहाय्यक अधीक्षक विनोद उत्तमराव कुळकर्णी यांनी हजारेंच्या विरोधात दि. ४ जानेवारी २०२३ रोजी परभणी ग्रामीण पोलिसांत फसविल्या बद्दल तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान जाधव हे करीत आहेत.
दरम्यान अशाप्रकारे अपहार आणि फसवणूकीच्या आणखी दोन निरनिराळ्या घटना झाल्याचे उघडकीस आले आहे. पाथरी तालुक्यातील हदगाव डाकघरात नागसेन पांडुरंग हत्तीअंबिरे यांनी एका खातेदाराने २७ हजार १८१ तर दुसऱ्या एका घटनेतील विनायक भीमराव सातपूते यांनी एका खातेदाराचे रुपये ५२ हजार एवढी रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा न करता स्वत:त्याच फायद्यासाठी वापरुन अपहार केला होता. २६ ऑगस्ट २०१३ ते २०१७ या कालावधीत घडलेल्या या दोन्ही अपहार घटनांच्या प्रकरणी सहाय्यक अधीक्षक विनोद कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने पाथरी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
अशाप्रकारे विश्वासाने पोस्टात भरल्या जाणाऱ्या रकमांचे मोठ्या प्रमाणात अगदी खुलेआम अपहार होतांना दिसून येत आहे. विश्वासू म्हणून बघितले जाणाऱ्या पोस्टालाही आता मोठ्या प्रमाणात अपहार आणि फसवणूकीचे ग्रहण लागले जात आहे. त्यामुळे शासकीय विश्वासार्हतेलाच तडे जात आहेत. परिणामी इच्छा असूनही ठेवी ठेवण्यासाठी किंवा एखाद्या योजनेसाठी रकमा गुंतवायला कोणीही धजावत नसल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने तातडीने यात लक्ष घालून वाढीस लागलेली भ्रष्टाचाराची ही कीड वेळीच नष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या अजगरासारखी ही भ्रष्टाचारी ही पिल्लावळ अधिकच मुजोर व मग्रूर बनली जाईल. पोटाला चिमटे घेऊन पै पैसा जमविणाऱ्या गोरं गरिबांचे संसार उध्वस्त केल्याशिवाय ही पिल्लावळ नक्कीच थांबणार नाही. ज्यामुळे संपूर्ण पोस्ट खाते व केंद्र शासन पूरते बदनाम होऊ शकेल एवढे मात्र नक्की.


