
दैनिक चालू वार्ता उपसंपादक-प्रा.मारोती बुद्रुक पाटील.
——————–
अहमदपूर येथे जिजाऊ- सावित्री व्याख्यानमाला पुष्प पहिले
————————–
अहमदपूर ( प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेतून एकता साधण्याचा प्रयत्न केला जातो. संसारात सतत प्रामाणिकपणाने व आनंदाने जगा, संसारामध्ये सकारात्मक सुख पहा आणि आज प्रत्येकाने आपल्या संसारात मुलीपेक्षा सुनेला व सासू-सासर्याला परिवारामध्ये सन्मान करा असे आग्रही प्रतिपादन श्रीगोंदा च्या प्रबोधनकार ह. भ. प. सुनंदाताई भोस यांनी केले.
त्या दि. 30 रोजी संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित मराठा सेवासंघ आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 17 वर्षापासून चालू असलेल्या जिजाऊ -सावित्री व्याख्यानमालेतील या वर्षीचे पहिले पुष्प गुंफताना “आयुष्यावर बोलू काही” या विषयावर त्या बोलत होत्या.
यावेळी ह भ प सुनंदाताई भोस म्हणाल्या की दंत कथेवर विश्वास ठेवू नका .विवेकावर आधारित जीवन जगा. जिजाऊने शिवबावर ज्याप्रमाणे संस्कार केले त्याप्रमाणे आईने आपल्या परिवारावर सर्वच दृष्टीने संस्कार केले पाहिजे. या देशात सावित्री नसती तर या देशाची स्त्री घडली नसती म्हणून स्त्रीचा त्याग लक्षात घ्या .स्त्रीभृण हत्या करू नका. इतिहासातून प्रेरणा घ्या.
आई -बाबा आणि पालक यांनी जबाबदारीने वागावे. संस्कार बाजारात मिळत नसून ते परिवारात आणि विद्यालयात मिळत असल्याचे सांगून सोन्यापेक्षा सोन्यासारखे संस्कार करून देश घडवा. परद्रव्य व परनारी या दोघांपासून दक्ष रहा. नात्यात कायम ओलावा ठेवा असे जाहीर आवाहन केले.
व्याख्यानमालेचा शुभारंभ जिजाऊ सावित्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करून जिजाऊ वंदन श्रीमती उषा किरण पांचाळ यांनी प्रास्ताविक मीनाक्षी जाधव , परिचय मीरा घोगरे यांनी सूत्रसंचालन बालिका चापटे यांनी तर आभार सुषमा तराटे यांनी मानले.
या व्याख्यान मालेला माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, साहित्यिका ललिता गादगे यांच्यासह मान्यवरांची व व्याख्यान प्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे व मराठा सेवा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके, अशोक चापटे प्रा. दत्ता गलाले, ज्ञानोबा भोसले, नाना कदम ,सिद्धार्थ दाबके, यांच्यासह मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.