दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई —अवयव दानाची चळवळ अधिक गतीमान आणि व्यापक होण्याची गरज असल्याचे मत आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या वतीने आज जागतिक अवयव दान दिनाच्या निमित्ताने येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. नमिता मुंदडा बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. मुकुंद मोगरेकर तर प्रमुख अतिथी म्हणून मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ सिध्देश्वर बिराजदार, उप अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, अधिसेविका उषा भयाने व इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या विस्तारीत भाषणात आ. नमिता मुंदडा पुढे म्हणाल्या की, भारतात अवयव दानाची आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया प्रत्यक्षात १९७१ साली सुरू झाली असली तरी अजूनही ही चळवळ सामान्य लोकांपर्यंत पोहोचली नाही. अवयव दानाच्या प्रक्रियेबद्दल सामान्य लोकांच्या मनात अनेक गैरसमज असून हे गैरसमज या अवयव दान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून दुर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचेल व हे महाविद्यालय महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या मोहीमेअंतर्गत चांगले काम करुन एक नवा विक्रम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
