
जोहान्सबर्गमधील द वाँडरर्स स्टेडियम संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दणाणून सोडले आहे. या दोघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात शतके ठोकताना भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च टी२० धावसंख्या तर परदेशातील सर्वोच्च टी२० धावसंख्या नोंदवली आहे.
त्यांच्या आक्रमणामुळे भारताने या सामन्यात तब्बल २३ षटकार आणि १७ चौकार ठोकले. या सामन्यात भारताने २० षटकात १ बाद २८३ धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर २८४ तब्बल धावांचे लक्ष्य असणार आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सलामीला खेळताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक खेळ केला. त्यांच्यात ७३ धावांची भागीदारी झाली. अभिषेक १८ चेंडूत ३६ धावांवर बाद झाला. त्यानेही २ चौकार आणि ४ षटकार मारले.
त्यानंतर मात्र संजू सॅमसन आणि तिलक वर्माचे वादळ आले. या दोघांनी एकाही दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाला स्थिरावू दिलं नाही. सॅमसनने २८ चेंडूत, तर तिलकने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही त्यांनी आक्रमक खेळ सुरू ठेवला.
त्यांनी २०० धावांची भागीदारी केली. ते भारतासाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी ठरले. सॅमसनने ५१ चेंडूत आणि तिलक वर्माने ४१ चेंडूत शतक पूर्ण केले. संजू सॅमसनचे हे २०२४ वर्षातील तिसरे, तर तिलकने सलग दुसरे शतक आहे.
त्यामुळे संजू एकाच वर्षाच तीन आंतरराष्ट्रीय टी२० शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला, तर तिलर सलग दोन आंतरराष्ट्रीय टी२० शतक करणारा सॅमसननंतरचा दुसरा खेळाडू ठरला.
अखेरीस २० षटकांनंतर संजू सॅमसन ५६ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांसह १०९ धावांवर नाबाद राहिला. तसेच तिलक ४७ चेंडूत ९ चौकार आणि १० षटकारांसह १२० धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी नाबाद २१० धावांची भागीदारी केली. ही दुसऱ्या विकेटसाठी झालेली आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोच्च भागीदारी ठरली.
दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव विकेट लुथो सिपाम्लाने घेतली. आता दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी साधायची असेल, तर या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. जर भारताने विजय मिळवला, तर भारतीय संघ ही मालिकाही जिंकेल.