
गुरुवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या आरोपीनं हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता सैफ अली खान आणि त्यांच्या इमारतीशी संबंधित अनेकांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात फ्लोअर पॉलिसिंगचं काम करणाऱ्या पाच कारागिरांना देखील ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आता चौकशीसाठी ताब्यात घेतलेले कामगार वारीस अली सलमान यांच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पतीला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडीओतील व्यक्ती आणि माझे पती वेगवेगळे आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती मला सापडला तर मी त्याला चपलेनं बेदम मारहाण करेन, त्याचं मुंडकं भररस्त्यात कापेन, अशी प्रतिक्रिया कारागिराच्या पत्नीनं दिली आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी सकाळी साडेचार वाजल्यापासून माझ्या पतीची चौकशी सुरू आहे. पतीने घरात पैसेही दिले नाहीत. माझ्या पतीची तब्येत बिघडली होती. त्यांनी घरी फक्त 500 रुपये दिले होते. मी अस्वस्थ आहे. रात्री जेवण देऊन आले स्टेशनमध्ये, भेटू द्या म्हटलं पण सरांनी भेटण्याची परवानगी दिली नाही. मी खूप रिक्वेस्ट केली. माझे पती सैफ अली खानच्या घरी कार पेंटरचं काम करतात, हे आम्हा सर्वांना माहीत आहे. माझं मॅनेजरसोबत बोलणं झालं होतं, सध्या कारपेंटरचं काम करणारे पाच कामगार आतमध्ये आहेत, ज्यांची चौकशी होत आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
याशिवाय सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती भेटला तर त्याला मी चपलेनं मारेन आणि त्याचं भररस्त्यात मुंडकं कापेन, असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी चौकशीसाठी ताब्यात असलेल्या कामगाराच्या मुलानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. “माझे वडील फर्निचरचं काम करतात, त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. त्यांनी ज्यादिवशी काम सुरू केलं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी कुणीतरी हा गुन्हा केला आहे”, असं मुलानं म्हटलं आहे.