
माजी आमदार अजितदादांकडे निघाला !
माजी आमदार राजन साळवी यांच्या सेना प्रवेशाच्या रुपाने उद्धव ठाकरे यांना धक्का बसलेला असताना काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डेही पक्ष सोडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
अशोक चव्हाण यांनी ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला त्याचवेळी हंबर्डे यांच्या पक्षप्रवेशासंबंधी चर्चा होत होत्या. परंतु पक्ष सोडून मी कुठेही जाणार नाही, असे ते वारंवार सांगत राहिले. पक्षानेही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
अजित पवार यांच्या नांदेड दौऱ्यात हंबर्डे यांचा प्रवेश होणार
पराभवानंतर पुढील पाच वर्षांच्या राजकीय भवितव्याची चिंता त्यांना लागून राहिली होती. याच दरम्यान त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले. पक्षप्रवेशासंधी चर्चा झाल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी अजित पवारांच्या नांदेड दौऱ्यात प्रवेश होईल, असा उभय नेत्यांमध्ये मुहूर्त ठरला.
विधानसभा निवडणुकीत मोहन हंबर्डे यांचा पराभव
मोहनराव मारोतराव हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून आमदार होते. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतरही ठामपणे ते नांदेड जिल्ह्यात काँग्रेस टिकावी, यासाठी पक्षात राहिले. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आनंद बोंढारकर यांनी हंबर्डे यांचा पराभव केला.
विधानसभा निकालाने वारे बदलले
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील वारे बदलेले आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा विधानसभा निवडणुकीत जिंकता आली नाही. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाणांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
कोण आहेत मोहनराव हंबर्डे?
-मोहनराव हंबर्डे हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत
-नांदेड दक्षिण मतदारसंघातून ते आमदार होते
-आनंद बोंढारकर यांनी हंबर्डे यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव केला
-मोहनराव हंबर्डे यांची अशोक चव्हाण यांचे खास निकटवर्तीय म्हणूनही ओळख आहे