समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब माध्यमांद्वारे नेमकेपणाने पोहोचविले जाते. माध्यमातील पत्रकारांनी वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देताना हाच नेमकेपणा साधायला हवा. अखंड कार्यरत राहताना आरोग्याची काळजी घेऊन वेळेत योग्य तपासण्या करण्यासाठी ‘हेल्थ कार्ड’चा पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना निश्चित फायदा होईल,असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी व्यक्त केला.
तसेच पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यविषयक सवलतीच्या दरात सुविधा मिळाव्यात, यासाठी पुण्यातील रुग्णालयांशी चर्चा करण्यात येईल, असा सूतोवाचही मोहोळ यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्यातर्फे पत्रकारांसाठीच्या ‘हेल्थ कार्ड’चे अनावरण मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे अध्यक्ष राजेंद्र मुथा, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.
महापालिकेत स्थायी समितीचा अध्यक्ष असताना क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या सहकार्याने ज्येष्ठांसाठी विशेष उपचार मोहीम राबविण्यात आली होती. आत्तापर्यंत लाखो ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात योग्य माहिती पोहोचविण्यासाठी माध्यमे व त्यात काम करणारे पत्रकार कार्यरत राहिले होते. समाजासाठी अखंड झटणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी अशा स्वरूपाची ही विशेष मोहीम अत्यंत स्तुत्य आहे, अशा भावना मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
अत्यंत आधुनिक आणि अद्ययावत लॅबच्या माध्यमातून क्रस्नातर्फे आरोग्यविषयक अनेक चाचण्या व तपासण्या केल्या जातात. खात्रीशीर आणि अल्प दरांतील या सुविधांचा फायदा आम्ही पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना करून देऊ शकलो, याचा अभिमान आहे. आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असा विश्वास क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक यश मुथा यांनी व्यक्त केला.
पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे यांनी आरोग्य सुविधा योजनांचा आढावा घेतला. मीनाक्षी गुरव यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी जाधव- केदारी यांनी सूत्रसंचालन केले. तर, ज्ञानेश्वर भोंडे यांनी आभार मानले.
