
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे(इंदापूर) :- इंदापूर तालुक्यातील कित्येक वर्षांची परंपरा असलेली व गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या शेटफळ हवेली येथील भैरवनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.२३ मार्च व सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रेच्या तयारी संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात आले.गुढीपाडव्याच्या दिवशी येथील ग्रामस्थांमार्फत पाडवा वाचन करण्यात आले.पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथ यात्रेला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने विविध स्तरांवर भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.
यात्रे निमित्त मंदिरावरती व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण गावामध्ये साफसफाई करण्यात येत आहे. मंदिर परिसरात सुशोभीकरण त्याचबरोबर अनेक विकास कामे युद्धपातळीवरती सुरू आहेत. मंदिर परिसरात मुरुमीकरण करण्यात येत आहे. संपुर्ण गावामध्ये विद्युत खांबावर एल-इडी बल्ब, लावण्यात आले आहेत. त्याच बरोबर शेटफळ हवेली गावाला जोडल्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. या यात्रेसाठी व नागरिकांच्या मनोरंजनासाठी आकाशी पाळणे, इलेक्ट्रिक ट्रेन, चक्री पाळणे, विविध खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, चपला आदी वस्तूंचे स्टॉल दोन दिवस अगोदरच दाखल होत असतात. शेटफळ हवेली येथील मुख्य रस्त्याच्या कडेला जागा पकडण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या स्टॉलधारकांची धांदल उडत असते.
यात्रेची सुरुवात बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी होत आहे. या दिवशी सकाळी ९:३० वाजता भैरवनाथ जोगेश्वरी यांचा भव्यदिव्य लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी ५ वाजता भैरवनाथाला गावाचा असलेला मानाचा पोशाख हा गावातून वाजत गाजत आणला जातो. रात्री ९:३० वाजता भैरवनाथ जोगेश्वरी यांचा छबीना निघणार आहे.याच दिवशी रात्री १२ वाजता संजय हिवरे-अमृता हिवरे यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता परंपरागत चालत आलेली तमाशा हाजरी असते. दुपारी ३:३० वाजता भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे भव्य असे जंगी कुस्त्यांचे मैदान भरले जाते. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो नामवंत पैलवान कुस्ती खेळण्यासाठी येत असतात. आणि रात्री ९ वाजता सर्वांसाठी दिलबहार हा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे.
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भैरवनाथ देवाचा भव्य दिव्य काढण्यात येणारा छबीना असल्याने यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक, नागरीक, महीला, तरुण या यात्रेसाठी हजेरी लावत असतात. यावेळी होणारी गुलालाची उधळण, भैरवनाथ जोगेश्वरी यांच्या नावाचा केला जाणारा जयघोष यांने मंदिर परिसर आवाजाने दणाणून जात असतो. त्याच बरोबर फटाक्यांची आतषबाजी, हलग्यांचा होणारा कडकडाट, बॅंन्जो पथक आणि डिजे,हालगी,पारंपारिक वाद्य आदी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यात्रेत तरुणी, महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांना धक्काबुक्की होऊन वाद होणार नाहीत. आणि यात्रेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची पोलिसांकडून दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच, गावातील वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरळीत राहण्याकडे लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेले दोन-तीन वर्षापासून भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या दारोदारी जाऊन यात्रेसाठी वर्गणी गोळा केली जात होती ती प्रथा बंद करून, महादेव मंदिरा समोरील पारावरती यात्रा कमिटी बसून असते व याच ठिकाणी ग्रामस्थ आपली वर्गणी येऊन देत असतात. याही वर्षी ग्रामस्थांनी यात्रेसाठीची आपली वर्गणी या पारावरती आणून जमा करावी व आपली रीतसर पावती घेऊन जावी असे आवाहन भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.