
स्वतंत्र देशाच्या घोषणेबरोबर मीर यार बलूच यांचे मोदींना आवाहन !
भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष शिगेला पोहचलेला असताना प्रसिद्ध बलुच लेखक आणि कार्यकर्ते मीर यार बलूच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले होते.
बुधवारी त्यांनी याचा पुनरुच्चार केला असून याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बलुचिस्तानच्या लोकांनी आपला राष्ट्रीय निर्णय घेतला आहे. जगाने आता गप्प बसू नये, असे सांगत त्यांनी भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मागितला आहे. तर, तुर्कीपेक्षा बलुचिस्तान निसर्गरम्य असून ते भारतीय चित्रपटांच्या शूटिंगचे केंद्र बनू शकते, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे
पाकिस्तानच्या हल्ल्यांना पतवून लावत भारताने पाकिस्तानी लष्कराची ठिकाणे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केल्यावर मीर यार बलूच यांनी ट्वीट करत, ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ची घोषणा केली होती. या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची तसेच सर्व सदस्य देशांची बैठक बोलावून त्याचे समर्थन करण्याची विनंतीही त्यांनी संयुक्त राष्ट्रांना केली होती. तर आता बलुची नागरिकांना पाकिस्तानी म्हणू नये, असे आवाहन त्यांनी भारतीय माध्यमे, युट्यूबर्स आणि विचारवंतांना केले आहे. आम्ही आमचा वंश वाचवण्यासाठी बाहेर पडलो आहोत, या आणि आम्हाला साथ द्या, असे भावनिक आवाहनही मीर यार बलूच यांनी केले आहे.
पाकिस्तानला दिलेली आंतरराष्ट्रीय मदत आणि कर्ज म्हणजे, पैसे वाया घालवण्यासारखे आहे. 1947 ते 2025 या काळात पाकिस्तानला पश्चिम राष्ट्रांकडून, आयएमएफकडून, जागतिक बँकेकडून अब्जावधी डॉलर्स मिळाले असले तरी, त्यांनी हजारो जिहादी गटांचीच पाठराखण केली. दहशतवादाविरुद्धच्या युद्धाचे कारण देत पाकिस्तानने अमेरिकेकडून निधी घेतला पण 9/11च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात 5000हून अधिक अमेरिकन सैनिक, नाटो सैन्य दल आणि नागरिक मारण्यासाठी दहशतवाद्यांना आर्थिक रसद पाकिस्तानने याच पैशांतून पुरवली, असा दावाही त्यांनी केला आहे.