
भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील आमदार बालमुकुंद आचार्य यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी तिरंग्याने नाक पुसल्याचे पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी भाजपकडून देशभरात १० दिवसांच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीमध्ये बालमुकुंद आचार्य यांनी चेहऱ्यावरचा घाम तिरंग्याने पुसरल्याने वादाला सुरुवात झाली आहे. हा व्हिडीओ शेअर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये भाजपचे आमदार बालमुकुंद आचार्य तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या एका हातात गदा आहे, तर दुसऱ्या हातात ‘ऑपरेशन सिंदूर पराक्रम अभूतपूर्व’ असे लिहिलेला बोर्ड आणि तिरंगा असल्याचे दिसते. चालताना बालमुकुंद आचार्य नाक, तोंड पुसण्यासाठी तिरंग्याचा वापर करतात असे व्हिडीओमध्ये दिसते.
यानंतर बाजूला चालत असलेला कार्यकर्ता बालमुकुंद आचार्य यांना चेहरा पुसण्यासाठी दुसरा कपडा देतो, ते त्या कपड्याने चेहरा पुसतात. त्यांच्यामागे बरेचसे लोक चालत असल्याचे दिसते. पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा लोक देत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
देशभक्तीचे प्रमाणपत्र देणारा आमदार तिरंग्याने नाक पुसत आहे. अशा प्रकारे तिरंग्याचा मान राखला जातो का? राष्ट्रध्वजाचा अपमान करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे म्हणत काँग्रेसच्या खासदाराने बालमुकुंद आचार्य यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही बालमुकुंद आचार्य यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बालमुकुंद आचार्य यांनी माफी मागावी अशी मागणी राजस्थान काँग्रेसने केली आहे.