
मला म्हणाले अमित शाह…
खासदार संजय राऊत सध्या आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकामुळे चर्चेत असून, यामध्ये त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यातच आता त्यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला आहे.
ईडीने अटक करण्याच्या एक दिवस आधी मला एकनाथ शिंदेंनी फोन केला होता असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. आपण अमित शाह यांच्याशी बोलू का अशी ऑफरही त्यांनी दिली होती असा संजय राऊतांचा दावा आहे. मात्र आपण समर्थ असून, वर बोलण्याची गरज नसल्याचं सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आम्ही नरकात गेलो असं कुठे म्हणत आहोत, तुम्हीच नरकात गेला आहात. एकनाथ शिंदेंचा काय संबंध आहे? अटकेच्या आदल्या दिवशी मला एकनाथ शिदेंनी अमित शाह यांच्याशी बोलू का असा फोन केला होता. मी बोललो काही गरज नाही. मी म्हटलं, वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. काही गरज नाही, उद्या मला अटक होऊ द्या आणि तुरुंगात जोय आहे. मी पळून जाणार नाही. वरती बोलण्याची गरज नाही. मी बोलू शकतो वरती, मी समर्थ आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
यावेळी संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोपही केला. अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच शिवसेना आणि भाजपात दरी पडली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की,अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच भाजपा आणि शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली. अमित शाह यांना अरुण जेटली यांनीही असं करु नका असं समजावलं होतं. मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वत: बोलले होते, अमित भाई हे करणं योग्य नाही. ते आपले जुने सहकारी आहेत. आपल्याला त्यांच्यासह राहायचं आहे. अरुण जेटलींनीच मला सांगितलं होतं की, मी दोन वेळा त्यांना समजावलं आहे.