
अरविंद केजरीवालांचा जोरदार हल्लाबोल !
आम आदमी पक्षाने आपल्या विद्यार्थी संघटनेचे आज उदघाटन केले अर्थात पक्षाची विद्यार्थी शाखा सुरू केली. असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे ‘एएसएपी’ असे या शाखेचे नामकरण करण्यात आले आहे.
यावेळी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीत जेव्हा आप १० वर्षे सत्तेत होती तेव्हा २४ तास वीज होती. आज दिल्लीत वीज कपात होत आहे अशी टीका त्यांनी केली.
दिल्ली विद्यापीठ, आयपी विद्यापीठ, पंजाब विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्वागत आहे, आज आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही मूलभूत गरजा सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत. देशाचे राजकारण यासाठी जबाबदार आहे.
राजकारण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते असे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणत केजरीवाल म्हणाले, आज आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत त्यांची मुळे आजच्या राजकारणात आहेत, ज्याला आपण मुख्य प्रवाहातील राजकारण म्हणतो.
काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांचे राजकारण ७५ वर्षांपासून सुरू आहे. दिल्लीत आपचे सरकार १० वर्षे सत्तेत असताना २४ तास वीज मिळत होती. आज दिल्लीत वीज कपात आहे. आम्ही दिल्लीत ज्या प्रकारचे राजकारण केले आहे ते पर्यायी राजकारण आहे.
लोकांना चांगले शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याची आम्हाला खात्री करायची आहे. त्यांना ते नको आहे. तीन महिनेही झाले नाहीत आणि भाजप सरकारने सरकारी शाळांची नासधूस करायला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील लोक वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार करत आहेत असे ते म्हणाले.