
72 तासांचे मुख्यमंत्री असतानाचा फडणवीसांचा निर्णय ठरणार ‘गेमचेंजर’ !
दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसतो. दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत असते.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाकडून पाणी अडवल्याने त्याचा फुगवटा तयार होत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा बसतो. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला खीळ बसत आहे. अशातच कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापुरातून संरक्षित करता येणार आहे.
महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यासाठी 72 तासांचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली होती. पुढील पंधरा दिवसांत मंजूर होऊन कामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा इचलकरंजीतील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जर प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण कार्यान्वित झाला. तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला हा निर्णय फायदेशीर ठरू शकणार आहे.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? –
”मी ७२ तासांचा मुख्यमंत्री असताना कृष्णा नदीच्या महापुराचे पाणी वळवण्याच्या जागतिक बँकेसोबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. तो आता अंतिम टप्प्यात आहे. महापुराच्या काळात सुमारे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून कर्नाटकला सुमारे 300 टीएमसी पेक्षा अधिक पाणी वाहून जाते. मात्र पुढे गेल्यानंतर हत्तरर्गी आणि अलमट्टी धरणाकडून पाणी अडवल्याने सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा फटका बसतो.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला अधिकचे वाहून जाणारे सुमारे १५० टीएमसी अतिरिक्त पाणी उजनी धरण आणि मराठवाड्याच्या बाजूला वळविण्याच्या योजना आखली आहे. यास मान्यता देखील मिळाली आहे. तर निविदा पंधरा दिवसांत काढली जाईल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुन्हा महापुराचा धोका राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त करून दाखवला आहे.
दरम्यान मराठवाड्याला खास करून सांगलीच्या दुष्काळी भागाला त्या निर्णयामुळे अधिक फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. शेतीसाठी पुरेपूर पाणी मिळत नसल्याने केवळ हंगामी पिकांवर दुष्काळी भागाचा जोर आहे. शिवाय मराठवाड्याला देखील याचा फायदा होणार आहे. त्यामुळे फडणवीस यांनी कालच्या भाषणात बोलताना, महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याचा पर्यायच प्रभावी ठरणार आहे.
याशिवाय जागतिक बँकेचे पथक याबाबतचा करार करायला आले होते. मी तो करार पूर्ण केला. पुन्हा सरकार गेले, काम थांबले. यावेळी मी 72 तासाचा मुख्यमंत्री होतो. आता त्याला गती आली आहे. पंधरा दिवसांत त्याबाबतची निविदा निघेल. अर्ध्या महाराष्ट्राचा दुष्काळ संपेल एवढे अतिरिक्त पाणी आपण वळवू, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.