
आठवलेंकडून महायुतीवर नाराजी !
मागील काही दिवसापासून राज्यातील राजकारण हे पवार आणि ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार या चर्चेभोवती फिरत आहे. अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील अॅड. प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याची ऑफर दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं. मात्र यानंतर सर्वच चर्चा आता मागे पडल्या असतानाच पुन्हा एकदा आठवले यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्यासाठी साद घातली आहे. यामुळे पुन्हा एकदा विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आठवले सांगलीत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध गोष्टींवर प्रतिक्रिया देताना राज्यातील सत्ताधारी महायुतीवर नाराजी व्यक्त केलीय. तसेच थेट जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
लोकसभापाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही आरपीआय गटाला सत्ताधारी महायुतीने उपेक्षा केली. यामुळे याआधीच रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. आताही त्यांनी स्थानिकच्या तोंडावर आपली थेट नाराजी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील. महायुतीकडून रिपाइंला या निवडणुकीत जागा मिळाव्यात, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच स्थानिकची निवडणूक रिपाइं महायुतीसोबत लढवणार असून राज्याची जबाबदारी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे दिली आहे. ठोकळे त्यांच्या नेतृत्वात सांगलीसह राज्यात चांगली बांधणी केली जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
आठवले यांनी मनातील खंत व्यक्त करताना, याआधी लोकसभेवेळी 1 तर विधानसभेवेळी आरपीआयने दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, त्यांना त्या मिळाल्या नाहीत. विधानपरिषदेच्या विधानपरिषदेमध्येही एकही जागा त्यांच्या पक्षाला देण्यात आले नाही. महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही. मात्र, शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायत असे कौतुक त्यांनी केलं आहे.
त्यांनी, माझ्या व्यतिरीक्त एक देखील मंत्री पद मिळालेलं नाही. माझ्या पक्षाचा एक खासदार किंवा आमदार देखील नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती आहे. त्यामुळे मला तीन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. मात्र, आमच्या पक्षातील लोकांना संधी दिली जात नाही. दिल्लीतच काय तर महाराष्ट्रातही पद दिलं जात नाही, अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी, आम्हाला एखादे महामंडळ किंवा मंत्रिपद मिळायला हवं होतं. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अनेकदा चर्चा झाली. मात्र, फडणवीस यांनी आमच्या पक्षाला विधानपरिषदेची एक जागाही दिली नाही. विधानसभेलाही जागा दिली नाही. किमान विधानपरिषदेची एक जागा देऊन आमच्या पक्षाचा एखादातरी मंत्री करायला हवा होता, अशी नाराजी बोलून दाखवली आहे.
शरद पवारांचे कौतुक
आठवले यांनी यांवेळी महायुतीबाबत आपली नाराजी व्यक्त करताना, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला न्याय दला होता. आता सत्तेत स्थान नाही, पण शरद पवार यांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाचे सहा ते सात जण विधान परिषदेवर होते. मंत्री देखील झाले. पण, महायुतीच्या काळात रिपाइंला सत्तेत पुरेसा वाटा मिळत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी आठवले यांनी, पुण्यातील घटनेवर भाष्य करताना, आपण पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांच्याकडील व्हिडिओ पाहिले. ज्यामुळे वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचे स्पष्ट होतं असल्याचेही म्हणाले. तसेच वैष्णवीच्या आई-वडिलांनी दोन कोटी रुपये द्यावेत, या मागणीसाठी सतत छळ करणाऱ्या सर्वांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा. त्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात दलित आणि महिलांवर अत्याचार वाढत असून ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत, अशीही मागणी आठवले यांनी केली आहे.
अलमट्टी धरणाच्या उंची
अलमट्टी धरणाच्या उंचीवरून प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, धरणाची उंची वाढवण्यास आमचाही विरोध आहे. पण कर्नाटक व महाराष्ट्र म्हणजे भारत पाकिस्तान नाही. हा विषय चर्चेतून सोडवण्यासाठी आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देवू. कर्नाटक सरकारशीही समन्वय साधू, असे आश्वासन दिलं आहे.
तर दहा ते बाराजणांना मंत्रिपदे
आमच्यातील गटबाजीमुळे आमचा समाज सत्तेपासून दूर राहिला आहे. यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष असलेल्या आरपीआयच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावे. आम्ही एकत्र आल्यास 25 ते 30 टक्क्यापर्यंत सत्तेत वाटा मिळू शकतो. महाराष्ट्रात दहा ते बाराजणांना मंत्रिपदे मिळू शकतात. अॅड. आंबेडकर यांच्याच घराण्यात तीन पक्ष निर्माण झाले आहेत. प्रथम त्यांनी एकत्रित यावे. समाजहितासाठी त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांना आठवले यांनी केलं आहे.