
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढवेल, त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
खा. राऊत रविवारी (दि. 25) जुन्नर तालुक्यातील ओझर येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवसेना उपनेते बबनराव थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी कायम राहावी असा आमचा नेहमी प्रयत्न आहे. ही आघाडी केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकीपुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका यासाठी सुद्धा ही महाविकास आघाडी रहावी, असे आमचे मत आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी चोरलेला पक्ष आहे, त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीला अमित शहा बसलेले आहेत, ते सांगतील तसे हे वागत असतात. छगन भुजबळ मंत्री झाल्यावर त्यांनी सांगितले की, मी नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मंत्री झालोय. त्यांनी अजित पवारांचे कुठेही नाव घेतले नाही.
भारतीय जनता पक्षाशी सोयरिक केलेला कुठल्याही पक्षाचा नेता कितीही मर्द असला तरी कालांतराने त्याचा सरपटणारा प्राणी होतो, अशी खिल्ली त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलताना उडविली.
छगन भुजबळांची अशीच काहीशी गत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले की, एकेकाळी भाजप एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता, तेव्हा सेना-भाजप एकत्र होती. आता ते तिसरा, चौथा, पाचवा असे कितीही उपमुख्यमंत्री करू शकतात. एवढेच नाही तर ते घटनेत बदल करून एकापेक्षा अधिक मुख्यमंत्रीदेखील करू शकतात.
जुन्नरचे आमदार तालुक्यामध्ये शरद सोनवणे विधानसभा निवडणुकीपूर्वी बिबट्याच्या समस्येवर म्हणाले होते की, यापुढे तालुक्यात एक तर बिबट्या राहील किंवा मी राहील. जुन्नर तालुक्यातून बिबट्या हद्दपार करणारच असे सांगून आमदार झाले, परंतु सध्या तेच कुठे दिसत नाहीत असे सांगत राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या दौर्यातदेखील ते कुठे दिसले नाहीत. शरद सोनवणे हे सुरुवातीला आमच्या पक्षातदेखील होते. नंतर ते राज ठाकरेंच्या पक्षात गेले होते. आता ते अमित शहा यांच्या पक्षात गेले असल्याची टीका या वेळी संजय राऊत यांनी केली.