
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी 26 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मुलींना संधी मिळाल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले.
अगदी सैन्य दलातही ते दिसून आले. ऑपरेशन सिंदूरबाबत दोन महिलांनी माहिती देऊन हे सिद्ध केले. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना दिली जाणार आहे. दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात 50 टक्के महिलांना निवडून द्या” असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
पुण्यातील बालगंधर्व येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते आले होते. यावेळी त्यांचे संबोधन करताना शरद पवार म्हणाले की, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सामान्य जनतेने साथ देत त्यांनी मोठा पाठींबा दिला. तुमच्या पैकी अनेक जणांना संधी मिळाली. प्रशासन चालवण्यास सामान्य कुटुंबामधील व्यक्तीला संधी मिळाली तर तो ही कर्तृत्व दाखवू शकतो, राज्य चालवू शकतो. त्यासाठी अनेकांची नावे घेता येऊ शकतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यावर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याचा परिणाम राज्यातसुद्धा दिसून आला. असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल, असे कधी वाटले नव्हते,असे म्हणत खंत व्यक्त केली.
वर्धापनदिनानिमित्त पक्षप्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले. कार्यकर्ते हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मौल्यवान ठेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचारांना पुढे घेऊन जातील. त्यामुळे सत्तेची चिंता करू नका. सत्ता आपोआप येईल, ती येण्याची स्थिती मला महाराष्ट्रात दिसते आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले की, पक्ष फुटीची चिंता तुम्ही करू नका, जे गेले त्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेबद्दलची बांधिलकी कायम राखली तर काहीही अडचण येणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले आहे.