
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. परंतु, कोणीतरी येतो आणि पक्ष चोरून नेतो. ज्यांना बाळासाहेबांनी मोठे पद दिले, मोठे केले तेच स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष सोडून जात आहेत.
त्यामुळे हा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर आली आहे. ती पार पाडावी, असे प्रतिपादन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ध्येय धोरणे मतदारांपर्यंत पोहाचवण्यासाठी पक्षाने प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. प्रभाग क्रमांक २२ ची बैठक विहीतगावच्या विठ्ठल मंदिरात तर प्रभाग क्रमांक १९ ची बैठक चेहेडीतील हनुमान मंदिरात झाली. खासदार वाजे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. उपनेते दत्ता गायकवाड म्हणाले की, कार्यकर्त्यांनी सामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर रहावे. उपनेते सुनिल बागूल म्हणाले की, शिवसेनेने सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून पक्ष मोठा केला. भाजपने शिवसेनेचेच लोक फोडून खोटे बोलून चार वर्षात मोठेपण मिरवणे सुरू केले. जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी व माजी आमदार वसंत गिते म्हणाले की, तीन वर्षापासून निवडणुक घेण्याची मागणी करूनही सरकार निवडणुका घेत नव्हते. मताचे दान हे आपल्या झोळीत पडणार नाही, अशी त्यांना भिती होती. आता न्यायालयाने निवडणुका घेण्यास सांगितल्याने सगळ्यांनी तयारी करावी.
लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक, भारती ताजनपुरे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल तानपुरे, वैभव ठाकरे, भैया मणियार, जिल्हा सचिव मसूद जिलानी, योगेश गाडेकर, माजी महापौर नयन घोलप, माजी नगरसेवक संतोष साळवे, सुनिता कोठुळे, अंबादास ताजनपुरे, व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव, योगेश भोर हे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही बैठकांना प्रभागातील पदाधिकारी विकास गिते, उपमहानगर प्रमुख किरण डहाळे, समन्वयक रमेश पाळदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.