
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिव्यांग आणि शेतकरी कर्जमाफी या विषयावर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे लोन आता राज्यभर पसरू लागले आहे. त्यामुळे भक्कम बहुमत असलेल्या महायुतीला देखील हादरे जाणवू लागले आहेत.
शेतकरी कर्जमाफी या प्रश्नावर आंदोलनासाठी कडू यांनी करेक्ट टायमिंग सादला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांच्या फोडाफोडीत भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना व्यग्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन लक्ष वेधून घेत आहे.
सरकारच्या बहुतांशी मंत्र्यांचा दौरा प्रामुख्याने निवडणुकीच्या तयारीची चाचपणी करण्यासाठीच असतो. या स्थितीत काँग्रेससह विरोधी पक्ष भांबावलेले आहेत. त्यांना बच्चू कडू यांचे आंदोलन त्यांना आधार ठरू शकते.
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राजकीय प्रश्न म्हणून पाठिंबा दिला आहे. प्रत्यक्षात आंदोलनात पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचा सहभाग नाही. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्न आणि करेक्ट टायमिंगवर होणाऱ्या आंदोलनात कुंपणावरच आहे.
काँग्रेस पक्षाची संघटनात्मक स्थिती मोजके विधानसभा मतदारसंघ वगळता फारशी अस्तित्वात राहिलेली नाही. पक्षाकडे सध्या तरी कोणताही राजकीय कार्यक्रम देखील नाही. राष्ट्रीय प्रश्नांवर क्वचितच काँग्रेसचे नेते पुढे होऊन प्रतिक्रिया देतात. या स्थितीत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असलेल्या कर्जमाफीच्या विषयावर काँग्रेस पक्ष अद्यापही गोंधळलेला दिसतो.
काँग्रेस आक्रमक भूमिका कधी घेणार?
नाशिक जिल्ह्यात या प्रश्नावर ठीकठाकणे आंदोलने होऊन बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. येवला तालुक्यात पाटोदा गाव बंद ठेवण्यात आले. चांदवडला झालेल्या रास्ता रोको मुळे महामार्गावर चार तास वाहतूक ठप्प होती.
राजकीय वातावरण बदलण्यासाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे हे प्रयत्न आहेत. त्यात विरोधी पक्ष मात्र आगामी निवडणुकांमध्ये काही करण्यासाठी धडपड करीत आहे, ना महायुतीला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नावर पुढे येऊन आक्रमक भूमिका घेताना दिसतो. त्यामुळे काँग्रेस पक्ष नेमका करतो तरी काय? असा प्रश्न राजकीय कार्यकर्त्यांना पडला आहे.