
नाशिक । शहरातील मुंबई नाका ते द्वारका या प्रमुख मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी, उड्डाण पुलाखाली वाढलेली भिक्षेकरींची गर्दी आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण याबाबत छगन भुजबळ यांनी आज अधिकार्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
यावेळी भुजबळ यांनी पाहणी दरम्यान अधिकार्यांना सूचना केल्या असता अधिकार्यांनी हे आपल्या अखत्यारित येत नसून दुसर्या विभागाकडे बोट दाखवले. अधिकार्यांची उत्तरे ऐकून भुजबळ चांगलेच संतापले. कोणाचे काय काम आहे मला शिकवू नका, मी मुंबई महापालिका सांभाळली आहे. जमत नसेल तर स्पष्ट सांगा, मग मंत्रीपद राहीलं बाजूला या शहराचा नागरीक म्हणून रस्त्यावर उतरायलाही मागे पुढे पाहणार नाही अशी तंबी भुजबळ यांनी अधिकार्यांना दिली.
राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्यनातून व्दारका चौकातील सर्कल हटविण्यात येत असून मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर या ठिकाणी सिग्नल बसविण्यात येणार आहे. परंतू हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून या कामाची मंत्री भुजबळ यांनी भेट देत पाहणी केली. उडडाणपूलावर पावसाळी कामाची दुरूस्ती केली जात असल्याने वाहने खाली रस्त्यावर येतात. त्यामुळे चौकात दिवसभर वाहतूक कोंडी होते.
व्दारकापासून थेट सारडा सर्कलपर्यंत रांगा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी या ठिकाणांहून मार्गक्रमण करतांना वाहनधारकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.या पाहणी दरम्यान, भुजबळ यांनी अधिकार्यांना चांगलेच फटकारले. सर्व्हिस रोडवरील वाहनांची गर्दी, मुंबई नाका ते व्दारका चौकातील वाहतूक कोंडी, उडडाणपूलाखाली थाटलेले संसार, अनधिकृत रिक्षा थांबे हे सगळे पाहून छगन भुजबळ चांगलेच संतापले.
यावेळी अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असता भुजबळ म्हणाले, मुंबई महापालिका मी स्वतः सांभाळली आहे. कोणाचं काय काम आहे, हे मला माहीत आहे. अधिकार्यांनी जर आपलं काम वेळेत केलं नाही, तर मी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करेन!असा दमच भुजबळांनी अधिकार्यांना भरला.
नाशिकचे अधिकारी फारच बिझी
मी अनेकदा अधिकार्यांना सूचना केल्या मात्र नाशिकचे अधिकारी फारच बिझी आहे. त्यांना मानस हॉटेलला जायला वेळ आहे, पण इथे यायला वेळ नाही. मला सगळे माहीती आहे. मी आज इथे मंत्री म्हणून नाही तर नागरीक म्हणून आलो आहे. शेवटी लोकशाही आहे. बघू काम केले तर ठिक नाही तर तुमचे काम आम्ही करू उद्यापासून असे सांगत भुजबळ यांनी अधिकार्यांना चांगलीच तंबी दिली.