
माळेगाव कारखान्याचं भलं करायचं असेल तर फक्त अजित पवारच करू शकतो. लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवणाऱ्यांच्या हाताताच सत्ता देण्याचा निर्धार सभासदांनी करावा.
माळेगाव कारखान्याचा चेअरमनही मीच होणार आहे. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करणार’, हे शब्द आहेत उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे. माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक गाजू लागली आहे. आज निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पाहुणेवाडी येथे भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत अजित पवार यांनी विरोधकांना धडकी भरवणारी घोषणाच करून टाकली. अजित पवार म्हणाले, ‘माळेगाव कारखान्याचं भलं करायचं असेल तर फक्त अजित पवारच करू शकतो. लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवणाऱ्यांच्या हाताताच सत्ता देण्याचा निर्धार सभासदांनी करावा. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करणार. माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार आहे. पुढील पाच वर्षांत कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला.
मी एकाला सहकारमंत्री केलं, काळजी करू नका
बारामतीचा आमदार म्हणून मी राज्यात फिरत असतो. आता जर मी कारखान्याचा चेअरमन झालो तर कारखान्याचं कोणतं काम अडेल का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. मी माझ्यासोबत 40 आमदार निवडून आणले आहेत. त्यातील एकाला सहकारमंत्री केलं आहे. त्यामुळे काळजी करु नका आपलं कोणतही काम खोळंबणार नाही. मी स्वतःच चेअरमन झालो तर कारखान्याला शिस्त आणल्याशिवाय राहणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.
चौरंगी लढत निश्चित, शरद पवार गटाचाही पॅनल
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी चौरंगी लढत निश्चित झाली आहे. या निवडणुकीत अजित पवारही उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या निळकंठेश्वर पॅनलमध्ये सात विद्यमान संचालक, पाच माजी संचालकांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बळीराजा सहकार बचाव पॅनल दिला आहे. पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे यांनीही सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. कष्टकरी शेतकी समिती आणि अपक्षांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.