
तरच माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भरतो; नेत्यानं सांगितला अजितदादांचा तो किस्सा…
शनिवारी बारामतीमध्ये माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली, या सभेमध्ये अजित पवार यांनी स्वत: चेअरमनपदासाठी आपल्या नावाची घोषणा केली.
यावरून आता सहकार बचाव शेतकरी पॅनचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले तावरे?
अजित पवार यांच्या पॅनलचा चेअरमन घोषित करा असं आम्ही म्हणालो नाही, अजित पवार नुसतं बोलतात सहकार वाचविणार असं सांगतात, जगदंबा कारखाना नाममात्र भावात घेतला त्या कारखान्याला मदत केली असती तर तो कारखाना सहकारी राहिला असता. स्वतःचा छत्रपती कारखाना अजित पवार यांना वाचविता आला नाही, आणि सांगतात लाथ मारील तेथे पाणी काढेल, अजित पवार फक्त थापा मारण्याचे काम करतात, असा घणाघात चंद्रराव तावरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माझं वय 85 वर्षे आहे, खासदार आणि आमदार निवडणुकीत मुंबईपर्यंत मला घेऊन गेले, मुख्यमंत्री यांना सांगितले यांना सांगा तरच माझ्या पत्नीचा फॉर्म भरतो, त्यावेळेस माझं म्हातारपण चाललं. कालपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्ही चेअरमन व्हा यासाठी माणसं पाठवली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी होते.
तुम्हीच चेअरमन व्हा आणि संचालक मंडळ निवडा आपण एकत्र येऊ, यासाठी माणसं पाठवली जात होती, असा खुलासा यावेळी तावरे यांनी केला आहे.
अजित पवार यांचे खासगी कारखाने चांगले चालतात, परंतु ते सहकारी कारखाने तसे का चालवीत नाहीत? अजित पवार माळेगाव कारखान्याची साखर भिजली नाही असं सांगत आहेत. परंतु त्यांनी माणसं घेऊन यावं आम्ही माणसं घेऊन येतो साखर भिजली का नाही आम्ही सर्वांना दाखवून देऊ, आम्ही चर्चेला तयार आहोत, या समोरासमोर बाकीच्या लोकांना दम द्या आम्ही काम केलेली माणसं आहोत. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी स्वतःच्या नावाची चेअरमन पदासाठी घोषणा करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा घालवली. अजित पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणूक संदर्भात दोन सर्व्हे केले आहेत, परंतु दोन्ही सर्व्हे त्यांच्या विरोधात गेल्याने अजित पवार निवडणूक लांबणीवर टाकत होते, असा आरोपीही यावेळी तावरे यांनी केला आहे.