
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपसाठी संघाची ‘पॉवर’…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपच्या मदतीसाठी पुन्हा आरएसएस धावून आल्याचं दिसतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रविवारी नागपुरात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित होते.
आता हे बळ निवडणुकांना भाजपसाठी स्थानिक पातळीवर काय करिष्मा दाखवणार याची उत्सुकता आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. त्यातच भाजपच्या मदतीला पुन्हा एकदा संघ सरसावल्याचं दिसून येत आहे. नागपुरात डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात संघाचं आणि परिवारातील संस्थांचं मंथन सुरू आहे.
एरवी अशा बैठका हा संघाचा नियमित उपक्रम असला तरी या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तब्बल पाच तास फडणवीस या बैठकीला होते. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विदर्भातले भाजप मंत्री आणि विदर्भातले जवळपास सर्व आमदारही उपस्थित होते. या उपस्थितीमुळे ही भाजप आणि संघाची समन्वय बैठकच होते हे निश्चित झालं.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीही अशाच पद्धतीने संघ आणि भाजपमध्ये अनेक बैठका पार पडल्या होत्या. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या माध्यमातून संघाने त्या निवडणुकीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या काय भूमिका बजावली हे पण सर्वांसमोर आले होते.
भाजपसाठी संघ पुन्हा दक्ष
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान संघ आणि भाजपच्या 5 बैठका झाल्या होत्या.
- लोकसभा निवडणुकीनंतर 5 जूनला फडणवीसांनी पत्रकार परिषदेत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.
- त्यानंतर 6 जूनला दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी सहसरकार्यवाह अतुल लिमये आणि फडणवीसांची बैठक झाली.
- त्यानंतर 23 जुलैला मुंबईत सहसरकार्यवाह अरूण कुमार, अतुल लिमये, चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांशी चर्चा केली.
- त्यानंतर 3 ऑगस्टला नागपूरला रेशीमबागेत फडणवीसांची पुन्हा अरूण कुमार, अतुल लिमये यांच्याशी चर्चा झाली.
- 9 ऑगस्टला संघाच्या विदर्भ प्रांत समन्वय बैठकीतही फडणवीस सहभागी होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान संघ आणि भाजप यांच्यात पाच बैठका झाल्या. लोकसभा निवडणुकांपेक्षा अगदी उलट चित्र राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये दिसलं. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सज्ज झालेल्या भाजपला संघाची पॉवर मिळणार हे उघड आहे. महाविकास आघाडीसोबतच भाजपच्या मित्रपक्षांसाठीही हा अलार्मिंग कॉलच म्हणावा लागेल.