
वडिलांनंतर पुत्रालाही मिळाला बहुमान !
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आहे. साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे साताऱ्यात यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे पिताश्री अभयसिंहराजे भोसले यांनी पार पाडली होती, त्यामुळे वडिल अभयसिंहराजे यांच्यानंतर स्वागतध्यक्ष होण्याचा बहुमान मंत्री शिवेंद्रराजेबाबा भोसले यांना मिळाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान सातारा (satara) जिल्ह्याला तब्बल 32 वर्षांनंतर मिळाला आहे. यापूर्वी साताऱ्यात 1993 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यानंतर तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्यात 99 वे मराठी सारस्वतांचा मेळावा भरणार आहे.
साताऱ्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन या संस्थांनी साताऱ्यात साहित्य संमेलन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मराठी साहित्य महामंडळाने साताऱ्याला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान दिला आहे. ते संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी साहित्यप्रेमींची असणार आहे.
साहित्य संमेलनाच्या आयोजनाची मागणी करणाऱ्या संस्थांची एकत्रित बैठक साताऱ्यात झाली. त्या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव स्वागताध्यक्षपदासाठी सुचवले. त्याला उपस्थित सर्वांनी एकमताने मंजुरी दिली आहे, त्यामुळे शिवेंद्रराजेंवर स्वागताध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वी साताऱ्यामध्ये 1993 मध्ये झाले होते, ते ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. त्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पिताश्री अभयसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. त्यानंतर आता शिवेंद्रराजेंवर जबाबदारी आली आहे, त्यामुळे वडिलांनंतर आता शिवेंद्रराजेंना स्वागताध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.