
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावरच छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी आमदार कैलास पाटील यांच्याकडे हे पद होते.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीन टर्म पदवीधरचे आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांना आता संघटनात्मक बांधणीची जबाबदारी दिली आहे.
मुंबईत आमदार सतीश चव्हाण यांना नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार तथा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, ओमप्रकाश पोकर्णा, मिनल खतगावकर आदींची उपस्थिती होती. (NCP) सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाचा विचार पोहचवून जिल्ह्यातील पक्ष संघटन प्रभावी व लोकहिताचे काम करण्यावर आपला भर राहील, अशी प्रतिक्रिया सतीश चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना दिली.
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकंदरीत 26 वर्षांच्या वाटचालीत निष्ठावान कार्यकर्ते आणि कर्तबगार नेत्यांच्या जोरावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांशी आपली नाळ जोडली आहे. (Chhatrapati Sambhajinagar) खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षात कधीच जात, पात, धर्म, राजकीय पार्श्वभूमी असे काहीही न पाहता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्याला संधी दिली जाते.
त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास एकदा नव्हे तर तीन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा आमदार आणि आता छत्रपती संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष होण्याची संधी मिळाली असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला याबद्दल पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे आमदार सतीश चव्हाण यांनी आभार मानले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी जोडलेला जिल्हा राहिला आहे. या जिल्ह्यातील सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाचा विचार पोहचवून जिल्ह्यातील पक्ष संघटन प्रभावी करण्यावर आपला भर राहील. गावपातळी ते तालुका अशी पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येईल. पक्षाचे सर्व सेल कार्यान्वित करून युवक, महिला व मुख्य जिल्हा कमिटीची नव्याने रचना करण्यात येईल. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक नंबरचा पक्ष व्हावा, यादृष्टीने पक्षविस्तारासाठी लक्ष देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
तसेच स्थानिक पातळीवरील युवा नेतृत्वाला पक्षामध्ये काम करण्याची अधिकाधिक संधी दिली जाईल. महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याबरोबरच अर्थकारणामध्ये तिचे हात बळकट केले जातील. शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची ताकद निश्चितच वाढलेली दिसेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला