
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बडगुजर भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
अखेर आज त्यांनी भाजपात प्रवेश केलायं. बडगुजर यांच्यावर आधी भाजप नेत्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांची स्तुतिसुमने गात असल्याचं दिसून आलं. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वच नेत्यांसह बडगुजरांच्या फाईलीचा सगळा हिशोबच काढलायं.
सुषमा अंधारे म्हणाल्या, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप्रवेशामुळे सकाळपासून आज भाजपचे नेते अकलेचे तारे तोडत आहेत. ते म्हणतात की, भाजपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. बडगुजर यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. भाजपमध्ये असं कोण आहे की ज्याच्यावर आरोप केले त्याने भाजपात प्रवेश केल्यानंतर आरोप सिद्ध झालेले आहेत. याउलट भाजपात प्रवेश केल्यानंतर क्लीनचीट मिळत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
तसेच आवाज केला तर तुझी घोटाळ्याची फाईल बाहेर निघू शकते, असं त्याला सांगितलं जातं. त्यामुळे भाजप कोणाला सोबत घेते कोणाला नाही घेत यावर बोलणं व्यर्थ आहे. भ्रष्टाचार मुक्त भारतचा नारा देणारी पार्टी आता भ्रष्टाचार युक्त पार्टी झालीयं. सर्वच भ्रष्टाचारी लोकं भाजपात येण्यास इच्छूक आहेत त्यांना सर्वांना भाजपमध्ये घ्या
जो कोणी खूनी, बलात्कारी जामीनावर बाहेर असेल त्याला आरोपातून वाचायचं असेल तर त्याने भाजपमध्ये प्रवेश करुन घ्यावा. भाजपलाही आता पक्ष वाढवायचा आहे त्यामुळे पक्षप्रवेश करुन क्लीनचीट मिळवा, असंही अंधारे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, भाजपने नवाब मलिकांना सोबत घेतलं नाही त्याचं कारण म्हणजे नवाब मलिक मुस्लिम आहेत. मुस्लिम असल्याने त्यांना वेगळा न्याय आणि बडगुजरांसाठी वेगळा आहे. बडगुजर तुम्ही गेलात सुखी रहा कारण तुमची खरी जागा ईडी, सीबीआय, गुन्हेगारी बलात्कारी लोकांनी ग्रस्त असलेल्या लोकांसोबत होती तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचलात, अशी खोचक टीकाही सुषमा अंधारे यांनी केलीयं.
काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊस इब्राहिमचा साथीदार असलेला सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हायरल झाले होते. बडगुजर यांचे कुत्तासोबत संबंध असल्याचा थेट आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावेळी बडगुजर हे उद्धव ठाकरे गटात होते. पक्षफुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहिले. पण पक्षात सन्मान होत नसल्याचा आरोप करीत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलायं. त्यांनी आता आपल्या हाती कमळ घेतलंय.
बडगुजर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान, अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळाल्या आहेत. सुरुवातीला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ही दुपारी 2 वाजताची देण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार मंत्री गिरीश महाजनांसह इतर भाजप नेते कार्यालयात पोहोचले खरे पण चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे पोहोचलेच नाहीत. अखेर अनेकांना फोन केल्यानंतर बावनकुळे आणि चव्हाण हे पक्ष कार्यालयात आले. आज पक्षप्रवेश होणार याची कल्पना नव्हती आम्हाला वाटलं उद्या प्रवेश होणार या शब्दांत बावनकुळे यांनी आल्यानंतर सारवासारव केली. विशेष म्हणजे याच बडगुजर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊच्या कसिनोमधील फोटो समोर आणला होता. त्यामुळे बावनकुळेंच्या अडचणी वाढल्या होत्या.