
किती नगरसेवक निवडून आणणार ?
भाजपने मिशन महापालिका सुरू केले आहे. रोज नवा कार्यक्रम घेऊन ते जनतेच्या दरबारात जात आहे. नागपूर महापालिका जिंकण्याच्या संकल्पासोबतच पक्षाने यंदा १२१ नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे.
हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अतिशय बारकाईने नियोजन केले जात आहे. विरोधकांमध्ये सुरू असलेल्या भांडणाचा फायदाही घेण्याचे भाजपने ठरवले आहे.
२०१७च्या निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडूण आले होते. त्यावेळी ८० ते ९० नगरसेवक निवडूण येतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र मतदान आटोपताच तत्कालीन जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी भाजपचे १०८ नगरसेवक निवडूण येतील असा दावा केला होता.
सुरुवातीला यावर कोणी विश्वास ठेवला नव्हता. मात्र मतमोजणी आटोपताच बरोबर १०८ नगरसेवकच भाजपचे निवडूण आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. अनेकांनी मॅचफिक्सिंगची शंकाही व्यक्त केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली होती. विश्व हिंदू परिषदेचेही काही बंडखोर निवडणुकीत उभे झाले होते.
याशिवाय भाजपने अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे तसेच इच्छुकांच्या तिकिटा कापल्या होत्या. त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला होता. संघ मुख्यालय आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा वाडा असलेल्या महाल प्रभागात भाजपचे दोन गट आमने सामने आले होते. त्यांनी उघडपणे एकमेकांवर आरोप केले होते.
विशेष म्हणजे भाजपने शेवटच्या क्षणी इच्छुक उमेदवारांची यादी बदलवली होती. त्यामुळे अधिकच रोष वाढला होता. या सर्व घडामोडी आणि राजी नाराजीनंतरही भाजपने सर्वाधिक १०८ नगरसेवक निवडूण आले होते. दुसरीकडे याचवेळी काँग्रेसमध्येही तिकीट वाटपावरून मोठा असंतोष उफाळला होता.
नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले होते. एबी फॉर्म घेऊन उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात गेलेल्या एका नेत्याचा कारवर हल्ला करण्यात आला होता. तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेत अंडी फेकून काही कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला होता. याच कारणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी विकास ठाकरे हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते. तिकीट वाटपावरून त्यांच्यावरच सर्वाधिक रोष होता. त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचा एक गट सक्रिय झाला होता.
या पाडापाडीच्या राजकारणात ठाकरे यांच्यासह बहुतांश उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसचे फक्त २९ आमदार निवडूण आले होते. त्यावेळच्या आणि आजच्या राजकीय परिस्थिती फारकाही बदल झालेला नाही. उलट राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. १० नगरसेवक असलेल्या बसपातही आता कोणी जुने नेते शिल्लक राहिले नाही. आपसातील भांडणे टोकाला गेली आहेत. हा सर्व हिशेब काढून भाजपने यावेळी १२१ नगरसेवकांचे टार्गेट फिक्स केले असल्याचे समजते.