
प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मारली बाजी !
भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटण तालुक्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांना दणका दिला आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पाटणकर समर्थकांनी विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे, त्यामुळे पाटणकरांनी भाजपमध्ये विजयी सुरुवात केल्याची मानले जात आहे.
सत्यजितसिंह पाटणकर यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पाटण तालुक्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पाटणकर गटाने भाजपमध्ये विजयी सलामी दिली आहे, त्यामुळे पाटणकरांच्या दृष्टीने हा विजय महत्वपूर्ण ठरतो.
पाटणकरांनी भाजपमध्ये प्रवेशानंतर पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रूक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक लागली होती. त्यात निवडणुकीत पाटणकर गटाने पावनाईदेवी शेतकरी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी विरोधात पॅनेल उभा केला होता.
सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दिवशी बुद्रूक सोसायटीच्या निवडणुकीत पावणाईदेवी शेतकरी ग्रामविकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी यश मिळवत मंत्री शंभूराज देसाई समर्थकांच्या पॅनेलचा पराभव केला. यात निवडणुकीत पाटणकर गटाने सोसायटीच्या सर्वच सर्व १२ जागा जिंकल्या, तर विरेाधी देसाई गटाला आपले खातेही उघडता आलेले नाही.
दिवशी सोसायटीच्या सर्वसाधारण गटातून विश्वजित पाटणकर, अशोकराव पाटील, भगवान पाटील, मोहन बोंद्रे, प्रकाश यादव, जालिंदर सूर्यवंशी, निवास सूर्यवंशी, वसंत सूर्यवंशी हे विजयी झाले आहेत. महिला राखीव गटामधून जयश्री थोरात, विमल सूर्यवंशी, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून रघुनाथ महापुरे, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सुभाष कुंभार हे उमेदवार निवडून आले आहेत.
ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, सुजित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश पवार, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब राजेमहाडिक, पाटण खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश जानुगडे, सुभाषराव पवार आदींनी नूतन संचालकांचे अभिनंदन केले आहे.