
राजू शेट्टींनी डिवचले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांची पगडी घातलेल्या छायाचित्रांची चर्चा सर्वत्र होत आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी या फोटोवरूनच मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री महोदय तुम्ही वारक-यांची जी पगडी घातली आहे त्या पगडीचा इतिहास आहे. पांडूरंगाचा भक्त असणारा व डोक्यावर पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोट बोलतो , ना कधी कुणाला फसवितो , ना कधी कुणाची निंदा नालस्ती करतो.
त्याच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा विठ्ठलाचा शब्द प्रमाण माणून तो जीवाच्या आकांताने पुर्ण करतो कारण या माझ्या वारक-यावर पांडुरंगाचे संस्कार आहेत. कर्जमाफीच्या तुमच्या नियम व पध्दतीमुळे राजकारणाच्या व सत्तेच्या साठमारीत राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज 8 शेतक-यांच्या माता भगिनींचे कपाळाचे कूंकु पुसण्याचे पाप तुम्ही करत आहात. यामुळे कर्जमाफीवर बोलताना किमान वारक-याची पगडी घालून तरी बोलू नका, कारण या पगडीवर पांडुरंगाच्या आचार विचाराचे संस्कार आहेत, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गांजा व अमली पदार्थाच्या नशाच्या विळख्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरूणाई गुंतू लागली आहे. याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात याकरिता जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार यांची शेट्टी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पालकांच्या व कुटूंबाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय झाला आहे. (Devendra Fadnavis) यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. 18 ते 30 या वयोगटातील मुलांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे.
कर्नाटक सीमाभाग तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये यांचे प्रमाण वाढू लागल्याने शाळा व कॉलेज परिसरात याचे पेव पसरले आहे. जिल्ह्यांमध्ये गुंडागर्दी व भाईगिरी करणा-या टोळ्या , जातीय व धर्मांध तेढ निर्माण करणा-या मंडळींकडून या प्रवृत्तीस चालना दिली जात आहे. शाळा व कॉलेजमध्ये विशेषता शहरी भागात मुलांना यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवले जात आहे. किरकोळ भांडणातून व गटबाजीमधून व भाईगिरीच्या वर्चस्वादातून एकत्रित येणारी तरूणाई हळूहळू गांजा व अमली पदार्थांच्या नशाच्या आहारी जावून गुन्हेगारीकडे वळू लागली आहे, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.
गेल्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने खून व मारामारीचे प्रकार घडत आहेत यामध्ये 18 ते 30 वर्षातील तरूण सक्रीय झाल्याचे दिसून येवू लागले आहे. ज्या परिसरात तरूणांच्या मध्ये भाईगिरीसाठी वर्चस्वासाची लढाई सुरू झाली आहे. गांजा व अमली पदार्थ नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील निर्मनुष्य विशेषत: डोंगरी भागातील ठिकाणी रात्र -दिवस गाजा व नशा होणा-या अंमली पदार्थाचे सेवन करण्यात येत आहे. फुले शाहू आंबेडकराच्या पुरोगामी विचाराने प्रेरीत असलेल्या जिल्ह्यात यापध्दतीने भरकटत चाललेली तरूणाई हा चिंतेचा विषय आहे.
पोलिस प्रशासनाकडून या गोष्टीवर जरब बसविणे सहज शक्य आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी तातडीने सर्व शाळा व महाविद्यालय परिसरात याबाबत पोलिस भरारी पथके नेमून कडक कारवाई करण्याची मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील सर्व शाळा , महाविद्यालये , सामाजिक संस्था , तरूण मंडळे यांच्या सर्वांच्या माध्यमातून तरूणाईमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करून उपाययोजना करण्याबाबतही पोलीस प्रमुखांशी सविस्तर चर्चा झाली.