
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीसह अनेक राजकीय विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. तसेच विरोधी पक्षाच्या पराभूत उमेदवारांकडून आक्षेप असलेल्या मतदारसंघातील निवडणुकीच्या दिवशीचे सर्व फुटेज मागितले होते.
आयोगानेही हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. अशातच, आता केंद्रीय निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. यात सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाचा हा निर्णय महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांसह महाविकास आघाडीसाठी मोठा झटका मानला जात आहे.
निवडणूक आयोगाचं म्हणणं काय?
केंद्रीय निवडणूक आयोगानं आमच्या व्हिडीओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची आरोप केला आहे.तसेच संबंधित व्हिडोओ,फोटो किंवा इतर फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या संशय व्यक्त आयोगानं आपल्या नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
याचदरम्यान, निवडणूक निकालाला कोणाकडूनही न्यायालयात आव्हान देण्यात आले,तर संबंधित फुटेज अधिकाऱ्यांना नष्ट करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण आदेशही आयोगानं दिले आहेत. पण आता आयोगाच्या या निर्णयावरुन मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपवर तुटुन पडले आहेत. त्यांनी महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर भाजपनं दरोडा टाकला असून काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं.तसेच केंद्रीय निवडणुक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार असल्याचा इशाराही पटोलेंनी दिला आहे.
‘दाल में कुछ काला…’
केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व फुटेज हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, निवडणुकीच्या प्रक्रिया किंवा मतदान प्रक्रियेत काही घोटाळा झालेला नसेल, तर नियम बदलण्याची एवढी घाई कशासाठी केली. या निर्णयावरुन नक्कीच काहीतरी दाल में कुछ काला है असं स्पष्ट दिसून येत हा आरोपही पटोले यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी ही निवडणूक चोरल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती. ही निवडणूक 2024 च्या निवडणुकांसाठीची ब्लूप्रिंट असल्याचंही ते म्हणाले. निवडणुकीत गडबड करण्याचे पाच टप्पे त्यांनी सांगितले. यात निवडणूक आयोगाच्या नियुक्तीत फेरफार करणे, बनावट मतदार जोडणे, मतदारांची संख्या वाढवणे, बोगस मतदान करणे आणि पुरावे लपवणे यांचा समावेश आहे.
भाजपने निवडणुकीत हेराफेरी केली. हेराफेरी म्हणजे मॅच फिक्सिंगसारखे आहे. फसवणूक करणारा पक्ष जिंकू शकतो. पण यामुळे संस्थांचे नुकसान होते. लोकांचा निकालावरील विश्वास उडतो, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.