
कार्यकर्ते तिकीट कटाच्या भीतीत…
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये नुकतच मोठं इनकमिंग झालं. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्याविरोधात पक्षाची धुरा खांद्यावर घेतली, त्याच नेत्यांना आता भाजपमध्ये स्थान मिळाल्याने अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्वतःचे तिकीट कापले जाईल, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
शिवसेना(उबाठा)चे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही त्यांना पक्षात प्रवेश दिला गेला. पक्षश्रेष्ठी कितीही नाराजी दूर झाली आहे किंवा सर्वजण एकत्र झाले आहेत असा दावा करत असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. या अस्वस्थेचे गटबाजीत रुपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरात तीन्ही आमदार भाजपचे आहेत. यापूर्वी महापालिकेत भाजपचीच सत्ता होती. मात्र भाजपला कोणत्याही परिस्थिती यंदाची महापालिका निवडणूक जिंकून नाशिक आपल्या ताब्यात ठेवायचं आहे. त्यासाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. मात्र हे लक्ष गाठण्यासाठी भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना गळाला लावत आहे. भाजपने विरोधी पक्षातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचा सपाटाच लावला आहे.
मात्र भाजप ज्यांना पक्षात घेत आहे, त्यांच्याविरोधात गेल्या विधानसभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. नाशिक शहरातील तीनही मतदारसंघांमध्ये भाजपने निर्णायक विजय मिळवला. हा विजय साकारण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली. विरोधी उमेदवारांविरोधात संघर्ष करताना काही कार्यकर्त्यांना कायदेशीर अडचणीही झेलाव्या लागल्या. त्यामुळे या विजयामध्ये निष्ठावंतांचा वाटा लक्षणीय होता. आता मात्र ‘शंभर प्लस’चा संकल्प साकार करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेतले जात आहे.
आम्ही प्रामाणिकपणे निवडणुकीत काम केलं, चांगले मताधिक्य मिळवले, तरी आमच्याच विरोधकांना तिकीट मिळणार असेल तर आम्ही काय करायचं?” असा प्रश्न सध्या निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदारांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.
विशेषतः नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रवेश घडवून आणल्यामुळे, स्थानिक पातळीवर दाद मागावी तरी कुणाकडे? असा प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.