
संतापलेल्या नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणारी ती प्रकरणंच काढली !
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात सतत वादग्रस्त विधानं करत राजकारण तापवणाऱ्या भाजप मंत्री नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला होता.
आता उद्धव ठाकरेंच्या याच टीकेवर नितेश राणे काय प्रत्युत्तर करतात याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर नितेश राणेंनी ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना स्वतःचा मुलगा कसा आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला पेंग्विन बोलून फरक पडत नाही.स्वतःच्या मुलाची अवस्था बघा, दिनो आणि दिशाबद्दल माहिती देत आहोत आम्ही, म्हणून टीका केली जाते. स्वतःच्या मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं, तर हे टाळता आलं असतं,असा हल्लाबोल राणे यांनी केला आहे.
राणे म्हणाले, महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या बापाचं नाव लावायची लाज वाटायची. राहुल गांधी स्टेजवर असताना हिंदू हृदयसम्राट बोलण्याची हिंमत तरी करा, शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे. राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. हम दो हमारे दो एवढंच तुम्ही केलं, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी ठाकरेंना लगावला.
काहीजणांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो, त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप मिळणारच असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच हिंदुत्वासाठी कोणी काम करत असेल तर ते बाळासाहेबांच्या मुलाला खटकणारच, म्हणूनच तर त्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, असं आम्ही बोलत असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं.
मंत्री नितेश राणेंनी यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवरही टीकात्मक टिप्पणी केली. ते म्हणाले, राज्याच्या हितासाठी ते भांडले नव्हते, त्यांचे कौटुंबिक भांडणं होती. लग्नामध्ये एकत्र येतात,तुम्हाला विचारून एकत्र येतात का? एकाकडे शून्य आमदार आणि एकीकडे 20 आमदार काय होणार? असा चिमटाही राणेंनी यावेळी काढला.
‘भाजपाचा एक बेडूक…’
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वर्धापनदिनाच्या भाषणात महायुती सरकारमधील मंत्री व वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेते नितेश राणेंची इज्जतच काढली.त्यांनी आपल्या भाषणात हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावले जात आहे. भाजपाचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे,असा थेट वार राणेंवर केला होता.
तुझी उंची केवढी,तुझा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही,असा टोलाही त्यांनी राणे यांना लगावला होता. ठाकरे म्हणाले, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय आहे? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे? आणि आमच्यावरती बोलत आहेस, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंचे अप्रत्यक्षपणे कान टोचले होते.