
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात, जो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 17 ते 18 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चेतन तुपे आमदार म्हणून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतरही अजित पवार यांच्या गटाने या मतदारसंघावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
आता हे वर्चस्व आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात अजित पवार यांनी शरद पवार गटातील तीन प्रमुख स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात सामावून घेतले आहे. हडपसरमधील माजी उपमहापौर निलेश मगर, बंडू तात्या गायकवाड आणि माजी नगरसेवक योगेश ससाने हे तिघे आज अधिकृतपणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.
हा पक्षप्रवेश शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातूनच शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप कार्यरत आहेत. त्यांच्या बालेकिल्ल्यातील महत्त्वाचे चेहरे अजित पवार गटात गेल्याने, जगताप यांच्यासाठी ही राजकीय दृष्टिकोनातून मोठी अडचण निर्माण झाली आहे.
हडपसरमधील ही घडामोड केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नसून, पुणे महापालिकेच्या चित्रातही मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. येत्या काही दिवसांत अजित पवार गट आणखी काही नेत्यांना आपल्या गोटात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.