
भारताचा युवा स्टार खेळाडू रिंकू सिंग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने अनेक सामने एकहाती फिरवले आहेत, त्यामुळे तो अल्पावधित लोकप्रिय झाला आहे. रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये झाला होता, त्याचे कुटूंब अतिशय साधे होते.
मात्र रिंकूने कठोर परिश्रमाच्या जोरावर क्रिकेटच्या जगात नाव कमावले आहे. त्यानंकत आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारने रिंकू सिंगला मोठी भेट दिली आहे. रिंकूला सरकारी नोकरी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रिंकू सिंगला मिळाली सरकारी नोकरी
योगी सरकाने रिंकू सिंगची बेसिक एज्युकेशन ऑफिसर पदावर नियुक्ती केली आहे. रिंकूची ही नियुक्ती थेट भरती नियमांनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करणारा रिंकु आता शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देणार आहे. रिंकूच्या नोकरीसंदर्भात शिक्षण संचालक (बेसिक) यांनी एक पत्र जारी केले आहे. याआधीही अनेक खेळाडूंना सरकारतर्फे नोकरी देण्यात आलेली आहे.
योगी सरकारने रिंकूच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानातील दखल घेत त्याला नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून रिंकूला शिक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि विद्यार्थ्यांसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. रिंकू सिंगने क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे, आता त्याला शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याची संधी मिळाली आहे.
रिंकूची कारकीर्द
रिंकू सिंगने उत्तर प्रदेशकडून खेळताना आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये प्रकाशझोतात आला. रिंकूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2023 मध्ये सुरू झाली. रिंकूने आतापर्यंत भारतासाठी 2 वनडे आणि 33 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 55 धावा आणि टी-20 मध्ये 546 धावा केल्या आहेत. तो सध्या आयपीएलमध्ये केकेआरचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने केकेआरसाठी 5 चेंडूत 5 षटकार मारण्याची कामगिरी केलेली आहे.