
पुतण्याने काकांना दाखवला कात्रजचा घाट…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची यंदाची निवडणूक मागील सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आणि प्रतिष्ठेची ठरली. यावेळी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते.
काका पुतण्याचा चितपट करतात का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत असतानाच पुतण्याने काकांनाच कात्रजचा घाट दाखवला आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. त्यामुळे राजकीय गोटात बारामतीकरांचा पवारांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.
‘घर फिरले की घराचे वासेदेखील फिरतात’
विशेष म्हणजे बारामतीकरांनी आत्तापर्यंत शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीत कधीच त्यांना निराश केलेले नाही. शरद पवार म्हणतील तोच अखेरचा शब्द अशी स्थिती तब्बल ५५ वर्ष कायम होती. मात्र, गेल्या दोन वर्षापासून बारामतीमध्ये ‘घर फिरले की घराचे वासेदेखील फिरतात’ अशी अवस्था झाली आहे.
पवारांचे घर राजकीय दृष्ट्या फुटले. त्यानंतर बारामतीकरांनी काका आणि पुतण्यांना आलटून-पालटून कौल दिले. त्यामुळे बारामतीकरांच्या कौलात मूळात विभागणी झाली. ती विभागणी आता अधिक रुंदावली असून ती शरद पवारांच्या अख्ख्या पॅनेलचा पराभव करण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
शरद पवारांना स्वतःला कुठल्याच निवडणुकीत कधीही पराभव पाहावा लागला नाही. याला अपवाद फक्त भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या निवडणुकीचा होता. बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जगमोहन दालमिया यांनी शरद पवारांचा फक्त एका मताने पराभव केला होता. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीत पवारांचा पराभव होऊ शकत नाही, हे रेकॉर्ड तुटले होते. आता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवारांनी उभ्या केलेल्या सगळ्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यामुळे बारामतीकरांनी दिलेला हा धक्का शरद पवारांच्या पचनी पडेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेली मजमोजणी संपली असून अखेर अधिकृत निकाल जाहीर झाला आहे. कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवलं असून त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला २१ पैकी २० जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनेलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा मात्र सुपडा साफ झाला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास ३५ तास चालली. त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व कायम राहिलं आहे. तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांनी प्रचारादरम्यानच अप्रत्यक्षपणे स्वतःचा विजय जाहीर केला होता. त्यावेळी पवारांनी कारखान्याचा अध्यक्षपदाचा चेहरा मीच आहे, त्यामुळे माझ्याकडे बघून मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले होते. तसेच विरोधकांनी तुमचा चेहरा कोण हे सांगावे, असे आव्हान दिले होते. दादांच्या अपेक्षेप्रमाणे मतदारांनीही त्यांना भरभरून मतं दिली आणि त्यांचा पॅनेल सत्तेत येणार, हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीवेळीच निश्चित मानले गेले होते.
पराभव झाला तरी राजकाण्यांमध्ये चर्चा शरद पवारांच्या खेळीची
पक्षातील प्रत्येक निर्णयाची जबाबदारी सध्या शरद पवार मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर सोपवतात. पण या निवडणुकीत पवारांनी त्यांच्या बळीराजा पॅनेलचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे न देता अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार याच्याकडे दिले होते. त्यामुळे जिंकून आला तर आपला नातू आणि पराभूत झाला, तर अजित पवारांचा पुतण्या, असे समीकरण पवारांनी अप्रत्यक्षपणे मांडले होते. या निवडणुकीतल्या पराभवामुळे युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. त्यामुळे पराभव झाला असला तरी पवारांच्या या खेळीच्या चर्चेने राजकारण्यांमध्ये उधाण आलं आहे.
जे आत्तार्यंत घडलं नव्हते ते घडलं
राज्याचा उपमुख्यमंत्री साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढतोय, असे आत्तापर्यंत कधी दिसले नव्हते, ते माळेगाव मध्ये अजित पवारांच्या रूपाने दिसले. ते स्वतः पहिल्या फेरीत निवडून आले. पहिल्या फेरीचा निकाल जाहिर झाल्यानंतर शरद पवारांना हा विजय पचनी पडला नव्हता. त्यांनी, यावेळी मी ४० वर्षे विविध सरकारी पदांवर राहिलो, पण कधीच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सहभागी झालो नाही. सरकारी पदावरील व्यक्तींनी अशा निवडणुकांपासून दूर राहिले पाहिजे. कारण जर कारखान्याचा प्रमुख एखादी सत्ताधारी व्यक्ती असेल, तर विरोधकांना न्याय मिळेल का, हा प्रश्न उभा राहतो, अशा शब्दांत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका केली होती.