
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास ३५ तास चालली. त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व कायम राहिलं आहे.
तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. मात्र, या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलला पराभवाला सामोरं जावे लागले आहे. दरम्यान, या पराभवानंतर राजकारण्यांमध्ये शरद पवारांनी या निवडणुकीत खेळलेल्या खेळीची चर्चा जोरदार रंगली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास ३५ तास चालली. कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवलं असून त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला २१ पैकी २० जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनेलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवार-युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलचा सुपडा साफ झाला. त्यांच्या पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आले आहे. निवडणुकीच्या या निकालानंतर युगेंद्र पवारांच्या पराभवाला वेगळं वळण लागलं आहे. या निवडणुकीत शरद पवारांनी काका पुतण्याचे नवं समीकरण निर्माण केल्याची चर्चा बारामतीकरांमध्ये रंगली आहे.
नेमकी पवारांची खेळी काय ?
पक्षातील प्रत्येक निर्णयाची जबाबदारी सध्या शरद पवार मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर सोपवतात. पण या निवडणुकीत पवारांनी त्यांच्या बळीराजा पॅनेलचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे न देता अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार याच्याकडे दिले होते. त्यामुळे जिंकून आला तर आपला नातू आणि पराभूत झाला, तर अजित पवारांचा पुतण्या, असे समीकरण पवारांनी अप्रत्यक्षपणे मांडले होते. या निवडणुकीतल्या पराभवामुळे युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. त्यामुळे पराभव झाला असला तरी पवारांच्या या खेळीच्या चर्चेने राजकारण्यांमध्ये उधाण आलं आहे.