
पुण्याच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकातील संविधानाच्या प्रस्तावनेत अनेक चुका असल्याचा आरोप बहुजन समाजवादी पार्टीकडून करण्यात आला आहे.
महामंडळाने 2023 मध्ये दहावीच्या हिंदी विषयाच्या हिंदी लोकभारती’ या पुस्तकाची पाचवी आवृत्ती छापली. यामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील मजकुरात अनेक चुका आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या चुका जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप करत बहुजन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी निषेध व्यक्त केला आहे. या चुका दुरुस्त कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहेत.
काय आहेत त्या चुका…
संविधानाच्या प्रस्तावनेतील पहिल्याच परिच्छेदात “धर्मनिरपेक्ष” या शब्दाऐवजी “पंथनिरपेक्ष” असा उल्लेख छापण्यात आला आहे.
“श्रद्धेच्या” ऐवजी “धर्म” शब्द वापरण्यात आला आहे
“समर्पित” या शब्दाऐवजी “आत्मर्पित” असा शब्द छापला आहे.
संविधानातील मूलभूत कर्तव्य लिहिताना “क्षमता” या शब्दाऐवजी “समरसता” असा शब्द वापरण्यात आला आहे.
मूलभूत कर्तव्ये ही 3 जानेवारी 1977 रोजी 42 व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानात समाविष्ट करण्यात आली होती. 1 एप्रिल 2010 रोजी लागू झालेल्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाची जबाबदारी शासनाची असताना, ती पालकांवर दाखवण्यात आली आहे. या सर्व त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी बसपाने केली आहे.