
राज्यात आगामी काळात हिंदी भाषेचा मुद्दा पेटणार असल्याचे आज स्पष्ट झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची समजूत काढायला शिवतीर्थावर गेलेल्या शिक्षणमंत्री दादा भुसेंची डाळ शिजली नाही.
त्यांचे राज ठाकरेंचे ततपप झाले. उलट भुसेंचे ऐकून घेतल्यानंतर राज यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसत सरकारविरोधात रान पेटविण्याची घोषणा करून टाकली.
राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला देत राज्यात त्रिभाषा धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा ही असाधारण भाषा म्हणून शिकविण्याचा आदेश नुकताच काढण्यात आला आहे. या आदेशानंतर राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत आदेश रद्द करण्याची मागणी काही केली होती.
राज यांच्या या भूमिकेनंतर सरकार ठाम राहिले. उलट त्यांची समजूत काढण्यासाठी गुरूवारी दादा भुसेंना आपले दूत म्हणून शिवतीर्थावर पाठविण्यात आले. ठाकरे आणि भुसेंमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर चर्चाही झाली. पण कळीचा मुद्दा पटवून देण्यात भुसेंना अपयश आले. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनीही त्यावर कटाक्ष टाकला. या मुद्द्यावर भुसे काहीच उत्तर देऊ शकले नाहीत, असे राज यांनीच स्पष्ट सांगितले.
भुसे भेटून गेल्यानंतर राज यांनी थेट आंदोलनाची घोषणा केली. येत्या 6 जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. या मोर्चात कोणाताही झेंडा नसेल केवळ मराठी हाच अजेंडा असेल, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह सर्व पक्षांच्या नेत्यांशी याबाबत बोलणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
मोर्चामध्ये राजकीय पक्षांसह मराठीवर प्रेम असलेल्या प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन करताना राज यांनी सूचक इशाराही दिला. इतरवेळी मराठीविषयी बोलणारे या मोर्चात सहभागी होतात की नाही, हे मला बघाचचेच आहे, असे राज म्हणाले आहेत. मग त्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते, कलाकार किंवा अन्य कुणी असतील, याबाबत राज यांनी सूचक इशारा दिला आहे.