
सर्वपक्षीय नेत्यांना राज ठाकरेंचे आवाहन !
हिंदी भाषेच्या सक्तीबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी भुसे यांचे म्हणणे ऐकून घेतले, पण राज्यात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असे ठामपणे सांगितले.
राज ठाकरेंनी काही आम्हाला काही सूचना केल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तपशील मांडणार आहे, असे दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांना सांगितले.
शक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज राज्यव्यापी बैठक
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकरी मैदानात उतरले आहेत. आज सायंकाळी 05 वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. खासदार विशाल पाटील, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर सहभागी होणार आहेत.
हा सर्व पक्षीय मोर्चा असेल:राज ठाकरे
हिंदी भाषा सक्तीबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी भेट घेतली. त्यानंतर ‘शिक्षणमंत्र्यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे,’ असे राज ठाकरे यांनी ठणकावले. 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा सर्व पक्षीय मोर्चा असेल, राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. पक्ष बाजूला ठेवून सहभागी व्हा, असे ते म्हणाले.
हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी
उद्धव ठाकरे म्हणाले.. भाषिक आणीबाणी सरकार लादत आहे, आम्ही ही हुकुमशाही सहन करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं तर हा विषय संपेल, असे ठाकरे म्हणाले. हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी आहे, असे ठाकरे म्हणाले. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मराठी साहित्यिकांनी एकत्र आले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमची दादा भुसे यांना भेटण्याची तयारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही या अन्याय सहन करणार नाही : ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीवर भूमिका मांडली. महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादता येणार नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेचा जन्म मराठी माणसांसाठी झाली आहे आम्ही या अन्याय सहन करणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
बबनराव लोणीकर हा भिकारी प्रवृत्तीचा माणूस: रविकांत तुपकर
भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेलं विधान म्हणजे आपल्या भिकारी आणि विकृत प्रवृत्तीचे विधान आहे. बबनराव लोणीकर हा भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे. उलट तुमच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, बूट एवढंच नव्हे तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब खाता तो घास आमच्या शेतकऱ्यांच्या घामातून आलेला आहे. सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती लोणीकरांना आलेली आहे, त्यामुळे त्यांनी तत्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले.
कोथरूडच्या बाई तुम्हाला एवढीच खुमखुमी असेल तर…
भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी यांच्या विरोधात वादग्रस्त मजकूर असलेले फ्लेक्स लावण्यात आल्याची घटना नुकतीच पुण्यात घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांवर गुन्हा करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या फ्लेक्सबाजीमागील आरोपींचा शोध घेण्यात येतोय. या घटनेमुळे पुणेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. तक्रारीनुसार, बालगंधर्व चौक परिसरात “कोथरूडच्या बाई तुम्हाला एवढीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा” अशा आशयाचा फ्लेक्स झळकवण्यात आला होता. गिरीश गायकवाड, अतुल दिघे आणि विलास सोनवणे ही नावे या फ्लेक्सवर छापण्यात आली होती.
उद्धव ठाकरे हिंदी सक्तीवर काय बोलणार?
हिंदी भाषा वादावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. हिंदी सक्तीवर ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
वायंगणी-बागायतवाडी समुद्रकिनारी सिलिंडर बॉम्ब
Sindhudurg:सागर रक्षक मित्र सुहास तोरस्कर यांना वायंगणी-बागायतवाडी समुद्रकिनारी साडेचार फूट लांबीच्या सिलिंडरचा बॉम्ब आढळला. बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोसच्या पथकाने पाहणी करून बॉम्ब सदृश्य वस्तू नसल्याची खात्री पटल्यावर तो निकामी केला. समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य बेवारस वस्तू आढळल्यास त्याची तत्काळ माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन केले.
पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली!
राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते १८ जुलै दरम्यान होणार आहे.
लोणीकरांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेचाही अपमान: राऊत
भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांचा उद्धार केला. त्यांचा समाचार खासदार संजय राऊत यांनी घेतला. तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, अंगावरचे कपडे, पायातील बूटही भाजपामुळेच आहेत,टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची जीभ घसरली आहे.राऊतांनी यावरुन लोणीकरांना खडसावले. हे महाशय कधीकाळी काँग्रेस पक्षातही होते. आणि मोदींमुळे या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचाही अपमान आहे, असे राऊत म्हणाले.
हिंदी सक्तीवरुन निर्माण झालेला वाद संपवणार?
हिंदी सक्तीवरुन निर्माण झालेला वाद संपवण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवतीर्थ ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी भुसे जाणार आहेत. हिंदी सक्तीबाबत दादा भुसे राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.भुसेंसह शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी राज ठाकरेंना हिंदी भाषा सक्तीबाबत माहिती देणार आहेत. ठाकरेंसोबतही शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असतील असे समजते. राज ठाकरेंची समजूत काढण्यात दादा भुसे यांना यश मिळणार का? हे लवकरच समजेल.