
हिंदीसक्ती करण्यामागे केंद्र सरकार – संजय राऊत
शालेय अभ्यासक्रमात हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत दिंनाक 5 जुलै रोजी सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हा मोर्चा ठाकरे बंधु एकत्र काढणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे अस वक्तव्य शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत महायुती सरकारवर जोरदार टीका करत म्हणाले की हिंदीसक्ती लादून मराठीचा मुडदा पाडण्याचं केंद्राचं धोरण आहे तसेच, हिंदीसक्ती करण्यामागे केंद्र सरकार आणि आरएसएसचा दबाव आहे. 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राच्या आदेशाने रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वात फक्त अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र त्यावेळी कोणताही जीआर काढला गेला नाही, हा जीआर फडणवीस यांनीच काढला आहे आणि आम्ही त्याची होळी करणार आहोत अस राऊत म्हणाले.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल माझं शरद पवार यांच्यासोबत देखील बोलणं झालं आहे. त्यांच्या पक्षाने देखील 5 जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस देखील हिंदी सक्तीच्याविरोधात आहे. मला खात्री आहे, काँग्रेसदेखील या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा देईल, तसेच अनेक छोटे पक्ष देखील मोर्चात सहभागी होतील, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई पालिका निवडणुकीत एकत्र लढावं, अशी आमची इच्छा आहे. हा मोर्चा आटपल्यानंतर मराठी माणसाच्या मनात चांगलं वातावरण तयार होईल. मराठी माणसांची एकी तुटणार नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावं, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईवर मराठी माणसांचा झेंडा फडकवायचा असेल तर बाळासाहेबांचे विचार पाळावे लागतील. मराठी शक्तींनी एकत्र यावं, असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे.