
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना
(मंठा)
येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय प्रशासनाने शासन आदेशांचा भंग करत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर शुल्क वसूल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड, मंठा तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत तालुकाध्यक्ष शिवश्री बालासाहेब खवणे यांनी महाविद्यालय प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले असून, तात्काळ शुल्क परतफेड न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, दि. १९ जुलै २०२४ चा शासन निर्णय (शिप्रु-२०२४/प्र.क्र.२०६/उ.प्र.४) आणि समाज कल्याण विभाग, पुणे यांचे पत्र (दि. २३ जून २०२५) हे स्पष्टपणे सांगतात की मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणतेही प्रवेश व शिक्षण शुल्क घेऊ नये. तरीही महाविद्यालयाकडून सर्वप्रकारची फी वसूल केली जात आहे.
त्याचबरोबर प्रवेश फॉर्मसाठी रोख रक्कम घेणे,डुप्लिकेट पावत्या, पावत्यांवर UDISE क्रमांक नसणे, आणि शासनमान्य डिजिटल प्रणालीकडे दुर्लक्ष करून रोख व्यवहार करणे हे प्रकारही नियमबाह्य असल्याचे सांगण्यात आले.
यामुळे शासनाच्या पारदर्शकतेच्या धोरणाला धक्का बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
*संभाजी ब्रिगेडने पुढील ठाम मागण्या मांडल्या आहेत:*
सर्व बेकायदेशीर फीची तात्काळ परतफेड
रोख स्वरूपातील शुल्क घेणे बंद करणे
शासनमान्य ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक शुल्क प्रक्रिया
पावत्या योग्य स्वरूपात, UDISE नंबरसहित द्याव्यात
प्रवेश फॉर्म शुल्क पूर्णतः रद्द करावे.
“विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला गप्प बसून पाहणार नाही. शासन निर्णय डावलून जर ही लूट चालूच राहिली, तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.”
शिवश्री बाळासाहेब खवणे
वसूल केलेली सर्व फी परत करावी, अवैधरित्या फिस वसुली थांबवावी,रोख व्यवहार थांबवावेत आणि शासनमान्य प्रणालीनुसार पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ब्रिगेडने दिला आहे.