
मंत्री योगेश कदम यांचा संजय राऊतांवर घणाघात !
संजय राऊत यांनीच शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा टाकला. २५ वर्षे यशस्वीपणे चाललेली युती त्यांच्या चुकीमुळेच तुटली. आज ते काँग्रेससोबत फिरत आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी राऊतांना पायताणाने मारले असते,” अशा तीव्र शब्दांत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना कदम यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता की, “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मिठाचा खडा टाकला आहे, जेणेकरून त्यांचे एकत्र येणे शक्य होणार नाही.”
यावर प्रत्युत्तर देताना योगेश कदम म्हणाले, “जे लोक स्वतः शिवसेना तोडतात, भाजपची युती संपवतात आणि नंतर काँग्रेससोबत हातमिळवणी करतात, त्यांनी इतरांवर टीका करण्याऐवजी स्वतः आपण काय केलं ते पाहावा.”
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात प्रवेश नाही
नाशिक महापालिकेतील परिस्थितीवर बोलताना कदम म्हणाले, “पूर्वी महापालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. यापैकी २८ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत काम करण्यास अनेकांची इच्छा आहे, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येकाची पारख करूनच निर्णय घेतले जातील.
या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादाला नवी धार मिळाली आहे. संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.