
भाषण थांबवले अन् पाहतच राहिले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाना या देशाच्या दौऱ्यावर आहेत. मागील तीन दशकांनंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान या देशात दाखल झाले.
आज मोदींचे संसदेतही भाषण झाले. त्याआधी त्यांचा घानातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले. भाषणादरम्यान मोदींनी भारतीय लोकशाहीचे महत्व पटवून देताना अनेक उदाहरणेही दिली.
भारतीय लोकशाहीच कौतुक करताना मोदींनी येथील राजकारणाची ओझरती माहिती दिली. ही माहिती ऐकून संसदेतील घानाचे सर्वच खासदार अवाक झाले. एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. पंतप्रधान मोदीही स्मितहास्य करत त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहू लागले. त्यावेळी संसदेतील खासदारांचे चेहऱ्यांवरील भावही कॅमेरात कैद झाले आहेत.
काय म्हणाले मोदी?
भाषणादरम्यान बोलताना मोदी म्हणाले, भारत लोकशाहीची जननी आहे. आमच्यासाठी लोकशाही केवळ व्यवस्था नाही तर मौल्यवान मुल्यांचा भाग आहे. भारतात 2500 हजारांहून अधिक राजकीय पक्ष आहेत, असे मोदींनी सांगताच संसदेतील खासदारांमध्ये खसखस पिकली. प्रत्येक खासदार एकमेकांकडे बघू लागले. हे पाहून पंतप्रधान मोदींनीही स्मितहास्य केले आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांचा आकडा सांगितला.
मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे भारतात 20 वेगवेगळ्या पक्षांची विविध राज्यांमध्ये सत्ता आहे, 22 अधिकृत भाषा आहेत, हजारो बोलीभाषा असल्याचीही माहिती दिली. त्यामुळे भारतात आलेल्या प्रत्येकाचे आम्ही मोकळ्या मनाने स्वागत केले आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
मोदींना घानाचेही कौतुक केले. ते म्हणाले, आम्ही घानाकडे पाहतो तेव्हा हे राष्ट्र अत्यंत साहसीवृत्तीने उभे असल्याचे पाहायला मिळते. हे राष्ट्र प्रत्येक आव्हानाचा सामना सन्मानाने करते. सर्वसमावेशक प्रगतीमुळे तुम्ही घानाला संपूर्ण आफ्रिका खंडात प्रेरणाचा दीपस्तंभ बनविले आहे.
दरम्यान, भारत आणि घानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांच्या उपस्थित चार महत्वपूर्ण करार झाले. दोन्ही देशांमधील राजकीय, सांस्कृतिक, संशोधन आदी क्षेत्रांमध्ये संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.