
अध्यक्षपदासाठी मोदी-शाहंच्या डोक्यात सरप्राईज नाव; संघही अनुकूल…
भाजपच्या संघटनात्मक निवडीला गेल्या काही दिवसापासून वेग आला आहे. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवड करण्यात आली असल्याने येत्या काळात लवकरच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे.
येत्या काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने भाजपमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप पहिल्यांदाच एखाद्या महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष पदावर संधी देऊ शकतो.
गेल्या काही दिवसांपासून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये याबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती पक्षातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे. महिला नेतृत्वासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देखील सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे आता निवडीसंबधीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर भाजपकडून देशभर संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
येत्या काळात भाजपकडून संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला जाणार असून महत्त्वपूर्ण बदल करून पहिल्यांदाच एका महिलेला राष्ट्रीय अध्यक्षपदी संधी दिली जाऊ शकते. या पदासाठी भाजपकडून निर्मला सीतारमण (Nirmla sitaraman), वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांच्या नावांची चर्चा आहे. या निवडीमुळे संघटनात्मक संतुलन, महिला सक्षमीकरण आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय येत्या काळात घेतला जाणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी महिलेला देण्यात यावी, याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे आता या पदासाठी अनेक महिला नेत्यांच्या नावांचा विचार सुरू झाला आहे. देशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महासचिव (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतली. दक्षिणेतील महिला चेहरा देऊन दक्षिण भारतासह महिलांना अपील करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
निर्मला सीतारमण यांच्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या तीन नावापैकी एक नाव फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.