
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना शहरातील यमुना रेसिडेन्सीमध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांवर अमानुष हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जालना: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना अमानुष मारहाणीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, हादरून टाकणारी ही घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित व्यक्तीने आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध केला होता. त्याचा राग मनात ठेवत दोन आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला केला. हा प्रकार जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी परिसरात आज घडला.
या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात मारहाण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.