
मराठी भाषा विजयी मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. तब्बल १९ वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर भाषण करणार आहेत.
वरळीमध्ये राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होत आहे. दोन्ही भाऊ एकत्र यावेत, ही मनसैनिक आणि शिवसैनिकांची कित्येकवर्षांपासूनची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आजच्या मेळाव्याबाबत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चाला उधाण आले आहे. ठाकरे बंधूंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, असा सल्लाच त्यांनी दिलाय.
ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांना आमच्या कायमच शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे. एकत्र रहावे आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षाचे एक पक्ष करावेत, असे सुधीर मुनगंटीवर म्हणाले आहेत. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांना बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंना दोन्ही पक्ष (शिवसेना-मनसे) एकत्र करण्याचा सल्ला दिला.
मराठी विषयावर दूर पर्यंत कोणतही राजकारण झालं नाही. पण हा गैरसमज का पसरवला गेला? हे मला अजून कळलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा पाचवीनंतर सक्तीची आहे. पहिलीपासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती. त्यासोबत बालवयात तिसरी भाषा सहज शिकता येते म्हणून अशी शिफारस उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या समितीने केली. मराठी, इंग्रजीसोबत हिंदी पहिल्या वर्गापासून शिकवल्या गेली तर ती सहज शिकता येते याच्यात मराठीचा काय संबंध आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मराठी माणसांनी इंग्रजी शिकणे अभिमान, पण मराठी माणसांनी हिंदी शिकणे म्हणजे मराठीचा अवमान, हे अजून मला समजलं नाही. कदाचित अजून ५० ते १०० पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दोन्ही बंधू सोबत आले तर आपण त्यांच्यासोबत जायचं नाही अशी काँग्रेसची भूमिका, असल्याचे मी ऐकलं, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणात राज्यात कारण नसताना गैरसमज कसे पसरतील हे अधिक महत्त्वाचं आहे, असेही ते म्हणाले.