
थेट ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र !
मुंबईतील एनएससीआय डोममध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा ऐतिहासिक मेळावा पार पडला. राज्याच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक क्षण होता. तब्बल 19 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र आल्याने समर्थकांमध्ये भावनिक लाट उसळली असली, तरी शिंदे गटाकडून या एकत्र येण्यामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक आणि सडेतोड पत्र लिहून ठाकरे गट आणि मनसेवर थेट टीका केली आहे.
मराठी भाषेच्या नावाखाली पुन्हा एकदा स्वार्थी राजकारण सुरू झालं असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे निव्वळ मुंबई महापालिकेवर डोळा ठेवून रचलेली राजकीय खेळी आहे. राज ठाकरे यांनी कधी काळी ज्या ‘बडव्यां’वर नाराजा होऊन घर सोडलं, त्यांच्याच खांद्यावर आज बसत आहेत, अशी थेट टीका सरनाईक यांनी केली आहे.
राज्याचे नेतृत्व करताना शिंदे यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा आणि मराठी भाषेसाठी केंद्र सरकारकडे केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत सरनाईक यांनी शिंदेंच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांनी केलेली मागणी असो, की ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय – हे खरे मराठीप्रेम असल्याचं सरनाईक म्हणाले.
त्यानुसार, उबाठा आणि मनसेने गेल्या अनेक वर्षांपासून केवळ भाषेच्या मुद्द्यावरून लोकांच्या भावना चिघळवत सत्ता उपभोगली. मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करणं, आंदोलन करताना मराठीची मागणी आणि प्रत्यक्षात इंग्रजीत लग्नपत्रिका छापणं, अशा दुटप्पी वागणुकीवर सरनाईक यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी हेही नमूद केलं की, मराठी तरुणांच्या हातात उद्योगधंद्याची संधी देण्यासाठी उबाठा आणि मनसेने कधीही प्रयत्न केले नाहीत.
सरनाईक यांच्या मते, राज-उद्धव यांचे एकत्र येणे हे विकासासाठी नाही, तर निव्वळ मतांसाठी आहे. मतं मिळत नसल्यामुळे राज ठाकरे थकले आणि शेवटी ‘बडव्यांच्या’ शरण गेले, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही वर्षांत मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या, आणि माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या या पक्षांनी प्रत्यक्षात काहीही ठोस काम केलं नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
या पत्रात सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं आणि जनतेसाठी त्यांच्या २४x७ काम करण्याच्या वृत्तीचं जोरदार समर्थन केलं आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री असताना हाती घेतलेल्या कोस्टल रोड, भुयारी मेट्रोसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत, हे सर्व सामान्य माणसाच्या भल्यासाठी असलेले निर्णय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय, कोरोना काळात मराठी रुग्णांसाठी लढलेले आणि देशात कुठेही अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी धावून गेलेले एकनाथ शिंदे हेच खरे जनतेचे नेते असल्याचंही ते म्हणाले.
पत्राच्या शेवटी सरनाईक यांनी शिंदेंना एक सच्चा कार्यकर्ता, मराठी मनाचा नेता आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार ठरवले. मराठी भाषेचा जागर व्हायलाच हवा, मात्र तो फक्त भाषणातून नव्हे, तर कृतीतून दिसावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
या भावनिक आणि आक्रमक पत्रामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय हल्ला म्हणजे शिंदे गटाकडून विरोधकांना दिलेला कडक इशारा मानला जात आहे.