
सुषमा अंधारेंनी महाजनांवर सोडला बाण…
नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रामुख्याने राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
या वादात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे.
हनी ट्रॅप प्रकरणी पोलिसांनी प्रफुल्ल लोढाला अटक केली आहे. हे लोढा गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागण खडसेंनी केली आहे. तसेच महाजनांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
महाजनांनी याबाबत पत्रकार परिषदेत खडसेंवर पलटवार केला होता. तसेच गुरूवारी त्यांनी पुन्हा एकदा खडसे आणि लोढाचा एक फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय, असे म्हटले आहे.
हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हा तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. 2019 ते 2022 च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले, असेही महाजनांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे, त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा, अशी टीकाही महाजनांनी खडसेंवर केली आहे. महाजनांच्या या पोस्टला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, गिरीशराव, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकायचे नसतात. चुकून तुमची काच फुटली तर प्रचंड बीभत्स दृश्य लोकांना दिसेल, असे अंधारे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. अंधारे यांनी एकप्रकारे महाजन यांना सूचक इशाराच दिल्याचे मानले जात आहे.