
आमदाराच्या आरोपाला आता नाथाभाऊंचं उत्तर; केली मोठी घोषणा !
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अनेकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं, त्यानंतर शुक्रवारी भाजप आमदारांनी जळगावमध्ये खडसेंविरोधात एकत्र पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी थेट चव्हाण यांना आव्हानच दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
मला आनंद वाटला असता ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, कर्जमाफी विषयी झाली असती तर, परंतु ही पत्रकार परिषद नाथाभाऊंना टार्गेट करण्यासाठी आमदारांना आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली, त्यांना ही पत्रकार परिषद का घ्यावी लागली? त्यांची मजबुरी मी समजू शकतो. मला या आमदारांवर फार काही बोलायचं नाही, कारण आता जे आमदार आहेत, त्यांना मीच घडवलेलं आहे, असा टोला यावेळी एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मंगेश चव्हाण यांनी एक मोठा आरोप माझ्यावर केला, माझ्या चारित्र्यावर आरोप केला, जवळपास मी 1980 पासून ते आतापर्यंत सक्रिय राजकारणात आहे. मी जवळपास 45 वर्षांपासून राजकारणात आहे. गिरीश महाजन हे मंत्री आहेत, ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहे, मी बारा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. त्यांना पूर्ण खातं देखील मिळालेलं नाहीये.
मी मंगेश चव्हाणांना आव्हान करतो की, तुमच्याकडे माझ्यासंदर्भात एक छोटी गोष्ट देखील पुरावा म्हणून असेल तर ती समजासमोर दाखवा, गप्पा मारू नका. जर तुम्ही पुरावा दिला तर मी सक्रिय राजकारणातून सन्यास घेईल असं आव्हानच खडसे यांनी आता चव्हाण यांना केलं आहे.
चव्हाण काय म्हणाले होते ?
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ‘एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता, असा आरोप चव्हाण यांनी खडसे यांच्यावर केला होता.