
पण त्यांनीच मला मुख्यमंत्री केले – पवार
वसंतदादा पाटील यांचे सरकार माझ्या नेतृत्त्वाखाली पडले हाेते; मात्र नंतरच्या काळात वसंतदादा यांनी माेठ्या मनाचे दर्शन घडवत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे साेपवली. मला यशवंतराव चव्हाण, विनायकराव पाटील अन् वसंतदादा पाटील यांच्यासारख्या माेठ्या मनाच्या नेत्यांची साथ लाभली, अशी भावना ‘राष्ट्रवादी’चे संस्थापक शरद पवार यांनी व्यक्त केली.
‘सॅटर्डे क्लब’तर्फे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये फूट पडून इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (आय) आणि स्वर्ण सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (एस) असे दोन गट तयार झाले. त्यावेळी ते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे असल्याने ‘एस’ काँग्रेसमध्ये होते. निवडणुकीनंतर कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. त्यावेळी आमच्यासारख्या तरुण नेत्यांचा काँग्रेस (आय) वर राग होता. वसंतदादांनी दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आमचा विरोध होता. या विरोधामध्ये मी आघाडीवर होतो. परिणामी, आम्ही एक दिवस वसंतदादांचे सरकार पाडण्याचा निर्णय घेतला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो.
सरकार पाडल्यानंतर 10 वर्षांनी सगळे नेते पुन्हा एकत्र आले. त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, यासाठी वसंतदादांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत रामराव आदिक, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. पण वसंतदादांनी सांगितले की, आता इतर कोणाच्या नावावर चर्चा नको. पक्षाला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर पक्षाचे नेतृत्व शरदकडे द्यायला पाहिजे. ज्या व्यक्तीचे सरकार मी पाडले, त्याच व्यक्तीने गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी पूर्वीचे मतभेद विसरून मोठ्या मनाने मला पुन्हा संधी दिली. त्या काळात काँग्रेसमध्ये असे मोठे नेतृत्व होते.
पवार म्हणाले, सध्या संसदेचे 14 दिवसांचे अधिवेशन चालू आहे, पण कामकाज सातत्याने ठप्प आहे. आम्ही फक्त सही करतो आणि आत गेल्यावर गोंधळ सुरू होतो. मग सभागृह तहकूब होते आणि दुसर्या दिवशी पुन्हा तेच. देशात अशी स्थिती यापूर्वी कधीही नव्हती. अशा प्रकारे त्यांनी आजच्या राजकारणातील अस्थिरतेवर टीका केली.