
NDA पुढे नवा पेच…
लवकरच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने सध्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असलेल्या सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
या घोषणेनंतर राधाकृष्णन यांनी एनडीच्या घटकपक्षांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, आता विरोधकांनीही या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. विरोधी इंडिया आघाडी राधाकृष्णन यांच्याविरोधात थेट इस्रोच्या एका संशोधकाला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव इंडिया आघाडीचा घटकपक्ष असलेल्या डीएमके पक्षाने ठेवला आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीसाठी विरोधक आपला उमेदवार म्हणून एका अराजकीय व्यक्तीची निवड करण्याचा विचार करत आहेत. या चेहऱ्याला एक राष्ट्रीय प्रतिष्ठा असायला हवी, असाही विरोधकांचा विचार आहे. हाच विचार लक्षात घेऊन डीएमके अर्थात द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एका वैज्ञानिकाचे नाव सुचवले आहे. हे वैज्ञानिक मूळचे तामिळनाडूचे आहेत. तसेच त्यांना देशात मान आहे, असे म्हटले जात आहे. मात्र या वैज्ञानिकाचे नाव काय आहे? हे अद्याप समोर आलेले नाही.
तामिळनाडूच्या आणखी एका नेत्याची चर्चा
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून द्रमुकचे नेते तिरुची शिवा यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र या नावांवार अद्याप सर्व पक्षांशी चर्चा होणे बाकी आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हेदेखील तामिळनाडू याच राज्यातून येतात. तामिळनाडून राज्यात 2026 साली विधानसभेची निवडणूक होणार आहे. हीच बाब लक्षात घेता विरोधकांनी राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. आता डीएमकेनेही विधानसभेची निवडणूक लक्षात घेता इंडिया आघाडीचा उमेदवार हा आमच्याच राज्यातून असावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता याबाबत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इंडिया आघाडीची बैठक, काय निर्णय होणार?
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यासाठी लवकरच इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित असतील असे सांगितले जात आहे. तर सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासारखे अन्य महत्त्वाचे नेते विरोधकांच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर असतील.